team jeevandeep 20/12/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे आणि लहुजी शक्ती सेना महासचिव बालाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लहुजी शक्ती सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ साबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
हा निर्णय संघटनेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार, सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन, आणि लहुजी शक्ती सेनेच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला. एकनाथ साबळे यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि ठाणे जिल्ह्यातील युवकांमध्ये नेतृत्वगुण जागवण्याचे वचन दिले. त्यांनी सांगितले की, "लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि मागासवर्गीय घटकांसाठी न्याय व समानतेसाठी लढण्याचे काम संपूर्ण ताकदीने केले जाईल."
कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या आगामी कार्ययोजनांवरही चर्चा करण्यात आली. लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी एकनाथ साबळे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितले की, "त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात संघटना अधिक बळकट होईल आणि संघटनेची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य होतील." साबळे यांच्यावर ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील समाज बांधव व पदाधिकारी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.