team jeevandeep 20/12/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : महसूल सहाय्यकाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले असून कल्याण तहसीलदार कार्यालयात ठाणे अँटी करप्शनने कारवाई केली आहे. जमिन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच मागितली होती. संतोष पाटील (४६) असे लाच घेताना पकडलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे.
संबंधित तक्रारदाराने कल्याण तालुक्यातील रायते गावी दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सातबारा उतारा आणि फेरफार कायदेशीरपणे स्वतःच्या नावे नोंद होण्यासाठी तक्रारदार शेतकरी प्रयत्नशील होता. ही सातबारा, फेरफार नोंद होण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित तक्रारदाराने आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि शासकीय दाखले कल्याण तहसिल कार्यालयात जमा केले होते.
मात्र त्यानंतरही सात बाऱ्यावर नोंद होण्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी महसूल सहाय्यक संतोष पाटील यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे मागितले जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता संतोष पाटील हा पैशांची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार बुधवारी सायंकाळी कल्याण तहसील कार्यालयातील महसूल साहाय्यक कक्षाच्या पाठीमागील बाजूला शेतकऱ्याकडून ४० हजार रूपयांची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने संतोष पाटीलला रंगेहाथ पकडले. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल साहाय्यक पाटील यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.