Team jeevandeep 17/12/2024 स्थानिक बातम्या
भाईंदर : मिरा रोड येथे एका पिसाळलेल्या श्वानाने लहान मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात मुलाच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दक्ष रावत(८) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. मिरा रोडच्या पूनम सागर परिसरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.हा मुलगा याच भागात राहत असून रात्री मित्रांसोबत खेळत होता.यावेळी एक भटका श्वान त्यामागे लागला. त्याने प्रतिकार करण्याच्या आतच भटक्या श्वानाने त्याच्या तोंडावर आणि डोक्यावर चावे घेतले.मुलाने आराडा- ओरडा केल्याने त्याची सुटका झाली. मात्र तो पर्यंत मुलाच्या शरीरातून रक्ताच्या झरा वाहू लागल्या होत्या.कुटुंबियांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.मुलाच्या तोंडाला गंभीर जखम झाल्याने प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दिवसाला सरासरी ४० जणांना श्वान दंश
मिरा भाईंदर शहरात भटक्या श्वानाचा उपद्रव मोठया प्रमाणात वाढला आहे. शहरात जवळपास ३० हजार भटके श्वान असून ते टोळीने नागरिकांवर हल्ला करत आहेत. जानेवारी महिन्यापासून आता पर्यंत जवळपास १२ हजाराहून अधिक जणांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. त्यानुसार शहरात दर दिवसाला ४० जणांना श्वानदंश होत असून पालिका प्रशासनाच्या उपायोजना कागदावरच असल्याचे आरोप होत आहेत.