Team jeevandeep 22/08/2024 स्थानिक बातम्या
खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मध्यस्थीने मुंबईत बैठक
कल्याण : भिवंडी लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्या मध्यस्थीने एनआरसी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भेट घेतली असून एनआरसी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली.
चार दिवसांपूर्वी माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्या निवासस्थानी एनआरसी कामगार आणि खासदार सुरेश म्हात्रे यांची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीच्या अनुषंगाने खासदार सुरेश म्हात्रे यांनी तातडीने मुंबई येथील प्रदेश कार्यालयात शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. कामगारांच्या विविध प्रश्न संदर्भात सविस्तर चर्चा केली.
गेल्या सोळा वर्षापासून एनआरसी कारखाना बंद असून कामगारांना त्यांची हक्काची देणे अद्यापही मिळाली नाही. कामगार न्यायाची प्रतीक्षा करीत असून गेल्या दहा वर्षात एकाही कामगार नेत्याने तसेच माजी आमदार व खासदारांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य न केल्याने कामगार वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एनआरसी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात एकाही नेत्याने विधानसभेत अथवा राज्यसभेत आवाज न उठविल्याने कामगार प्रचंड नाराज होते.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही कामगारांचा प्रश्न न सुटल्याने कामगारांनी अखेर माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्यामार्फत खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांची भेट घेतली. म्हात्रे यांनी तातडीने मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यालय येथे शरद पवार यांच्यासोबत कामगारांच्या देनी देण्यासंदर्भात बैठक बोलावली. या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. न्यायालयीन लढा तसेच अदानी समूहासोबत चर्चा करून लवकरात लवकर कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे शरद पवार यांनी कामगार नेत्यांना आश्वासित केले आहे.
मुंबईत झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र कामगार आघाडीचे नेते भूषण सामंत, आयटकचे सेक्रेटरी उदय चौधरी, माजी नगरसेवक दया शेट्टी, एनआरसी स्टाफ युनियनचे अविनाश नायक, दिनकर वनकट्टे यांसह कामगार उपस्थित होते.