Thane jeevandeep 06/09/2024 स्थानिक बातम्या
श्रावणात भाविकांचा होडीतील जिवघेणा प्रवास थांबणार..!
टिटवाळा -: कल्याण शहापूर व मुरबाड या तिन्ही तालुक्यांच्या शिवेवर (सीमेवर) वसलेलं श्री क्षेत्र गंगागोरजेश्वर देवस्थान. हे देवस्थान पांडवकालीन आणि पुरात असे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच हे देवस्थान अगदी काळू नदीच्या त्रिवेणी संगम पात्रात अगदी मधोमध एका टापूवर निसर्ग अशा वातावरणात वसलेले आहे. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने भाविकांना या देवस्थाना पर्यंत जाता येत नाही. म्हणून या ठिकाणी साकव (पूल) व्हावा अशी मागणी गेली कित्येक वर्षे जोर धरून होती. याच साकवाच्या कामाचा भूमिपूजन नुकताच शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
गंगागोरजेश्वर देवस्थान हे अतिशय प्राचीन पांडवकालीन देवस्थान असून ते शहापूर तालुक्यातील मढ गावालगत काळू नदीच्या पात्रात वसले आहे. या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने मोठी जत्रा भरली जाते. तसेच याठिकाणी शिवरात्री निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात येते. तसेच श्रावणात या ठिकाणी सतत भाविक भक्तांची रीघ असते. परंतु पावसाळ्यात काळू नदीला पूर असल्याने शिवभक्तांना मंदिरात होडीने जीवघेणा प्रवास करून जावे लागते. तर कधी होडी नसल्याने भाविकांना पैल तिरावरूनच महादेवाचे दर्शन घेऊन नाराज होऊन परतावे लागते.
परंतु आता भाविकांची नाराजी संपणार आहे. गेली कित्येक दशकानंतर या ठिकाणी गंगागोरजेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी साकाव(पूल) निर्माण होणार आहे. याच कामासाठी बजेट मधून ८० लाखांचा निधी आमदार दौलत दरोडा यांनी मंजुर करून घेतला आहे. नुकताच सदर कामाच्या भूमीपूजनाचा नारळ देखील आमदारांच्या हस्ते वाढविण्यात आला. लवकर या पूलाचे काम सुरू होणार आहे. तसेच काळू नदीवर रहदारीसाठी मढ ते दहिवली असा पूल व्हावा ही जनतेची मागणी लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे व मी आम्ही दोघांनी मिळून यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती यावेळी आमदार दरोडा यांनी दिली.
या पुलामुळे शहापूर, कल्याण व मुरबाड या तिन्ही तालुक्यातील जनतेच्या दळण-वळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मढ फळेगांव, उशिद, हाल, अंबर्ज, शेरा, शेई, रूंदे, आंबिवली, दानबाव, दहिवली, हिरेघर, असोसे, करवेळे, वाघीवली आदी तीन्ही तालुक्यातील गावांचा ऐकमेकांशी संपर्क वाढणार आहे. यामुळे त्यांना चौऱ्यांऐंशीचा फेरा मारावा लागणार आहे तो थांबणार आहे. यामुळे या गावातील नागरिक कमालीचे आनंदीत झाले आहेत. लोकांतून दोन्ही आमदारांचे आभार मानले जात आहेत. या दोन्ही पूलामुळे गंगा गोरजेश्वर मंदिराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. तसेच यामुळे याठिकाणी पर्यटक व भाविक भक्तांची रीघ देखील वाढणार आहे. यामुळे या ठिकाणी आपसुकच स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या 2023-24 च्या विविध निधी मधुन 01) श्री क्षेत्र गंगा गोरजेश्ववर मंदिर मढ येथे ब्रिज बांधणे. 80 लक्ष. 02) मढ हाल वारलीपाडा रस्ता तयार करणे. 50 लक्ष 03) टोपलेपाडा येथे नळपाणी पुरवठा योजना तयार करणे. 05 लक्ष. 04) विठ्ठल रखुमाई मंदिर मढ येथे सभामंडप बांधणे. 07 लक्ष या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण लोकप्रिय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्ष सौ.कल्पना तारमळे, तालुका अध्यक्ष डॉ.श्री.मनोहर सासे,श्री. अंनत लगड, श्री. प्रेमकुमार बोटकोंडले, श्री. अविनाश गायकर,श्री. सुनिल गायकर,श्री. बाळू शिंगोळे. श्री. पंढरीनाथ पाटील, श्री. मधुकर गायकर सरपंच सौ. गीता जाधव, सदस्य श्री. गंगाराम गायकर,सदस्य सोमनाथ मुकणे, सदस्य रवि धोडी, सदस्य सुमित्रा धोडी व मोठ्याप्रमाणावर मढ-हाल ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.मढ-हाल ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचे यथोचित स्वागत करण्यात आले.*