पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण मिळावे!
बंगळुरू मध्ये एका कंपनीत अभियंता असलेल्या ३४ वर्षीय अतुल सुभाष या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्यावरील आपबिती ९० मिनिटांचा व्हिडिओ काढून तसेच ४० पाणी सुसाईड नोट लिहून सांगितली. या तरुणाला त्याच्या पत्नी आणि सासरच्यांनी हुंडाबळीच्या चुकीच्या आरोपाखाली तरुंगा मध्ये पाठवले होते. काहीही चूक नसताना या तरुणाला तुरुंगात जावे लागले. न्यायालयात तो स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही. समाजात त्याची बदनामी झाली त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. अर्थात अशी आत्महत्या करणारा अतुल सुभाष हा पहिला तरुण नाही याआधीही अनेक तरुणांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. ज्या तरुणांमध्ये आत्महत्या करण्याची हिंमत नसते ते तरुण पत्नीचा जाच मुकाटपणे सहन करतात किंवा घर सोडून आश्रमात जातात. औरंगाबादेतील वाळूंज भागात असाच पत्नी पिढीत पुरुषांचा आश्रम आहे. या आश्रमात काही पत्नी पिढीत पुरुष राहतात हे पत्नी पिढीत पुरुष वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पूजन करून पिंपळ पौर्णिमा साजरी करतात. हे पुरुष दरवर्षी पिंपळ पौर्णिमा साजरी करतात. आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की आम्ही त्यांच्यासोबत सात जन्मच काय सात सेकंदही संसार करू शकत नाही म्हणूनच आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव अशी प्रार्थना ते यम आणि मुंजाला करतात. हा प्रकार काहीसा विचित्र वाटत असला तरी खरा आहे. कौटुंबिक हिंसाचारात महिलांवरच अन्याय अत्याचार होतो. महिलाच हिंसेचा बळी ठरतात हे आपल्याला माहीत आहे पण पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरतात यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही याला कारण आहे आपली पुरुष प्रधान संस्कृती. पुरुषच महिलांवर अत्याचार करतो, त्यांचा मानसिक छळ करतो हेच आजवर आपण पाहत आलो आहोत पण आता काळ बदलला आहे. पुरुषही महिलांच्या अत्याचाराला बळी पडत आहे. आज कितीतरी पुरुष महिलांचा मानसिक अत्याचार सहन करत आहेत. पत्नी आपल्यावर अत्याचार करते, आपला मानसिक छळ करते हे जर समाजात माहीत झाले तर आपलीच नाचक्की होईल या भीतीने अनेक पुरुष तो अत्याचार मुकाट्याने सहन करतात. ज्यांना हा अत्याचार सहन होत नाही ते अतुल सुभाष सारखे तरुण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. कायदाही महिलांच्याच बाजूने आहे. महिलेचा पती व त्याच्या कुटुंबियांकडून होणारा छळ रोखण्यासाठी ४९८ ( अ ) हा कायदा करण्यात आला. महिलांना संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होऊ लागला आहे. या माध्यमातून पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध वैयक्तिक सुड उगवला जात आहे. महिलांनी त्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या अशाप्रकारे दुरुपयोग करू नये अशी टिप्पणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील केली आहे. तरीही या कायद्याचा दुरुपयोग कमी होत नाही. पत्नीने पती विरुद्ध तक्रार दिली तर त्याची तातडीने दखल घेतली जाते. पत्नीवर अन्याय करणाऱ्या पतीला तात्काळ अटक केली जाते पण पतीला पत्नी विरुद्ध कारवाई करायची असेल, तर आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार अधिनियमना सारखा कायदा उपलब्ध नाही. सध्या असलेला कौटुंबिक अधिनियम संरक्षण कायदा पुरुषांना संरक्षण देत नाही. विकसित देशांमधील लिंग निरपेक्ष कायदे पुरुषांना महिलां प्रमाणे संरक्षण तर देतातच ; शिवाय पुरुष पीडित असू शकतात या वास्तवाचा स्वीकारही करतात. त्यामुळे तिथे या विषयावर संशोधनही होत असते आपल्या देशात पुरुषही महिला अत्याचाराने पीडित असतात हे वास्तव अजूनही स्वीकारले जात नाही. पुरुष कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरुच शकत नाही अशी धारणा असणारे लोक सामान्यतः असा तर्क देतात की पुरुष हे महिलांपेक्षा बलवान असतात अशा स्थितीत महिला पुरुषांवर आघात कशा करू शकतात? पण एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की हिंसक संबंधांमध्ये महिलाही पुरूषां इतकीच आक्रमक होऊ शकते. शिवाय मानसिक छळ करण्यात महिलांचा हात कोणीही धरू शकणार नाही. विशेषतः जे संवेदनशील मनाचे पुरूष असतात ते अशा हिंसाचाराला बळी पडतात त्यामुळे महिलां प्रमाणेच पीडित पुरुषांनाही संरक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी सरकारने कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कायद्यात दुरुस्ती करून पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण द्यावे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५