Team Jeevandeep 21/08/2024 महत्वाच्या बातम्या
Thane Jeevandeep :
मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) बदलापूरमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हजारो नागरिक आंदोलनासाठी उतरले. नागरिकांचा एक गट आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेच्या आवारात आंदोलन करत होता. तर एका गटाने रेल्वेस्थानकात घुसून रेल्वेवाहतूक तब्बल १० तास रोखून ठेवली. पोलीस प्रशासन आणि सरकारतर्फे हे आंदोलन थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र अखेर सायंकाळी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगण्यात आले. आता पोलिसांनी हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांनी सांगितले की, छापील फलक, व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेज आणि इतर काही संकेतावरून हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे समजते. लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलकांकडे जे छापील फलक होते, तसेच इतर काही वस्तू आणल्या गेल्या होत्या. त्यावरून व्यवस्थित नियोजन करून हे आंदोलन केले गेले, हे दिसून येते. तसेच लाडकी बहीण योजनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावरून हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगितले जाते.
रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिसवे म्हणाले की, रेल्वे सेवा रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २६ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही चित्रण तपासल्यानंतर आणखी काही लोकांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल, असेही इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, काही व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी १० वाजता रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखली गेली. त्यानंतर ११ वाजता आदर्श शाळेबाहेरही आंदोलकांचा एक घोळका जमा झाला आणि त्यांनी शाळेत तोडफोड केली.