00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  team jeevandeep      17/12/2024      पाककृती


लागणारे जिन्नस: 

१) गोड जातीची  सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १
२) लिंबाचा  रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड
३) आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद )
४) १ टिस्पून बारीक केलेले अगर अगर
५) एक कपभरून मिल्क पावडर
६) १ टिस्पून साखर ( अधिक आपल्या आवडीप्रमाणे, स्वीटनरही वापरता येईल.)
७) १ टिस्पून साजूक तूप

क्रमवार पाककृती: 

अ‍ॅपल रबडी च्या नेटवरच्या ज्या रेसिपीज आहेत त्यात सफरचंद तसेच, म्हणजे न शिजवता वापरले आहे. मला हि रबडी गरम खायची होती ( आमच्याकडे थंडी पडलीय म्हणून ) म्हणून मी ते थोडे शिजवून घेतले. हाताशी होतेच म्हणून अगर अगर वापरले. तसेच ताजे दूध आटवता मिल्क पावडर वापरली. त्यामूळे हा प्रकार झटपट झाला.
१) एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस ( किंवा सायट्रीक अ‍ॅसिड ) अगर अगर ( वापरत असाल तर ) आणि दालचिनी पूड ( किंवा जो स्वाद वापरत असाल तो ) एकत्र करा.

२) सफरचंद शक्य असल्यास कोअर करा ( म्हणजे मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. त्यासाठी एक खास उपकरण मिळते. वरच्या फोटोत पहा. ) मग ते वरील पाण्यातच किसा. सफरचंदे करकरीत किंवा पिठूळ अश्या दोन प्रकारात मिळतात. कुठलेही वापरता येईल.

३) आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.
साखर वापरत असाल तर या मिश्रणातच घालून शिजवा. ( स्वीटनर अगदी शेवटी मिसळा. खुपशी स्वीटनर्स गरम करून चालत नाहीत. )

३) एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल.
तसे होऊ लाहले कि त्यात अर्धा कप पाणी टाका. ( हे पाणी शक्यतो लांब हाताचा डाव वापरून टाका कारण कढईचे तपमान जास्त असल्याने पाण्याची एकदम वाफ होऊन त्याचा चटका बसू शकेल. म्हणून जरी अर्धा कप पाणी टाकायचे असले तरी ते कपाने न टाकता डावेने टाका. )

४) त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो.

५) आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा.

आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१) सफरचंद शिजवायचे नसेल तर मिल्क पावडरचे मिश्रण थोडे थंड झाल्यावर किस मिसळा. अगर अगर वापरत असाल तर मात्र शिजवावेच लागेल.

२) या पद्धतीने केलेली रबडी थंड होताना घट्ट होत जाते.

३) आवडते इतर फळ ( सिताफळ, चिकू, आंबा, लिची ) वापरू शकाल.

४) या तंत्राने नुसती रबडीही छान होते. मिल्क पावडर मात्र चांगल्या प्रतीची हवी. मी निडो वापरलीय.

+