team jeevandeep 20/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण मधील सुभाष मैदानात होत असलेल्या इनडोअर गेमसाठीच्या हॉलला याआधीच मनसेने आणि क्रीडा प्रेमींनी विरोध केला होता. आज याठिकाणी मैदानावर या इनडोअर गेमच्या हॉलसाठीचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले असता मनसे कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींनी गोंधळ घालत केडीएमसीचे काम बंद पाडलं. महापालिकेने इतर ठिकाणी हे इनडोअर हॉल बनवावा, या मैदानाचा बळी घेतल्यास अधिकाऱ्यांचा बळी घेणार असा इशारा मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, चेतना रामचंद्र, अनिता प्रसाद, कपिल पवार, रोहन पोवार, संदीप पंडित, गणेश लांडगे, कैलास पनवेलकर, योगेश शाह, आश्विन कुलकर्णी, क्रिकेटप्रेमी समीर खान आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे मैदान आहे टे मैदान राहिले पाहिजे, मैदानाच्या नूतणीकरणाला विरोध नसून मैदान गिळंकृत करण्याला विरोध आहे. हाच प्रकल्प डोंबिवलीतील भागशाळा मैदान येथे गेला होता मात्र तिथे विरोध झाल्याने कल्याणमध्ये हा प्रकल्प लादत आहेत. हे होत असतांना मात्र याला लोकप्रतिनिधी विरोध करत नाहीत हे आश्चर्य असल्याचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितले.
केडीएमसीच्या आधिकाऱ्यांचा निषेध करत असून, मातीचे खेळ बंद करून इनडोअर गेम सुरू करण्याचा या अधिकाऱ्यांचा घाट असून जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही असा तीव्र इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिला.
सुभाष मैदान हे ऐतिहासिक मैदान असून याठिकाणी सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, तुषार देशपांडे यासारखे खेळाडू या मैदानात खेळले आहेत. सध्या मुलं मोबाइलमध्ये गुंतल्याने त्यांचे डोळे खराब झाले आहेत. त्यामुळे मैदानी खेळांची आवश्यकता असून यासाठी हे मैदान अबाधित राखणे गरजेचे आहे. सर्व क्रीडा प्रेमी या इनडोअर हॉल लं विरोध करत असून यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रिकेटप्रेमी समीर खान यांनी दिला आहे.
तर याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांना विचारले असता, सुभाष मैदान येथे खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या निधीतून इनडोअर हॉल बांधण्यात येत आहे. साडेसात कोटी निधी मंजूर झाला आहे. या कामाला आज सुरवात करण्यात आली होती. क्रिकेटसाठी मैदान सोडून हा हॉल बांधण्यात येत असून नागरिकांची समजूत काढून हे काम सुरू करणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.