Team Jeevandeep 12/03/2025 sthanik-batmya Share
टिटवाळा : टिटवाळा येथे एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कोणतीही पूर्वसूचना किंवा चौकशी न करता ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. रत्नाकर धर्मा पाटील यांच्या नावावर असलेल्या सर्व्हे नंबर २२३/२ स आणि २२३/२ फ या मिळकतीवर कांचनगौरी महिला सहकारी पतपेढीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन फलक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी वेळीच याला आक्षेप घेतला आणि याबाबत स्पष्टीकरण मागितले.
शेतकऱ्याने थेट प्रश्न विचारल्यावर पतपेढीच्या कर्मचाऱ्यांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते काही वेळाने तेथून निघून गेले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, पाटील यांनी या मानसिक त्रासाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात पतपेढीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, एका कर्जदाराने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी पतपेढीने त्याच्या मालमत्तेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संबंधित कर्जदाराने चुकीची जागा दाखवली आणि त्याच गैरसमजातून पतपेढीच्या वतीने पाटील यांच्या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. पतपेढीने ही चूक कबूल केली असून, पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प्रकरण मिटल्याचे सांगण्यात आले आहे.
तथापि, शेतकरी रत्नाकर पाटील यांनी आपल्या जमिनीबाबत होणाऱ्या चुकीच्या कारवाईला विरोध करताना हा विषय फक्त गैरसमजाचा नसून त्यांच्या प्रतिमेवर व मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा प्रकार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या वकिलामार्फत पतपेढीला नोटीस बजावली असून, या घटनेमुळे समाजात त्यांची झालेली बदनामी आणि मानसिक त्रास यासाठी पुढील कायदेशीर पाऊले उचलण्याचा विचार करत आहेत.