team jeevandeep 31/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमीच्या अल्ट्रा दौडचे आयोजन रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. हि 'दौड' भव्य, ऐतिहासिक आणि महाराष्ट्रातील एकमेव अशी अल्ट्रा दौड आहे. “एक दौड वीर जवानोंके लिए” गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली असे ६५ किमी. अर्बन अल्ट्रा दौड, ३५ किमी कॉन्फीडन्स दौड व १५ किमी इन्स्पायरींग दौड अशा तीन प्रकारात आयोजित करून देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या आणि देशवासीयांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दलात सेवा बजावणार्या सैनिकांप्रती आदर व त्यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी ही 'दौड' आयोजित केली जाते.
या दौडचे हे पाचवे वर्ष आहे. फक्त तेरा धावपटू पासून सुरुवात झालेली ही दौड यावर्षी जवळजवळ 300 धावपटूंना सहभाग करून घेणार आहे. हा सुद्धा एक विक्रमच आहे. ही दौड शनिवारी रात्री 12 वा. गेटवे ऑफ इंडिया येथून सुरु होईल व रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ८:३० दरम्यान नेहरु मैदान, गणपती मंदीर रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सांगता होईल. डोंबिवलीचे दोन्ही आमदार रवींद्र चव्हाण आणि राजेश मोरे प्रत्यक्ष हजर राहून सर्व धावपटूंचे स्वागत करणार आहेत.
गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, एनसीपीए, हुतात्मा चौक, पी डिमेलो मार्ग, शिवडी, वडाळा,सायन सर्कल, चेंबूर, वाशी बस डेपो, कोपरखैरणे, महापे, शिळफाटा, डी मार्टचा रस्ता बाल भवन डोंबिवली पश्चिम, रेल्वे मैदान असे करत ठाकुर्ली ब्रिज पासून गणपती मंदिर ते आप्पा दातार चौकमार्गे नेहरू मैदान डोंबिवली (पूर्व)येथे सकाळी ८.३० वा.संपन्न होईल.
संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यामधील आणखी एक उद्देश म्हणजे डोंबिवली कल्याण किंवा जवळपासच्या गावातून भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, निमलष्करी दल,पोलिस, इ. संरक्षण क्षेत्रात भरती होउ इच्छिणा-या होतकरू विद्यार्थ्यांसाठी भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र उभे करणे. हे केंद्र उभारणीसाठी निधी जमा करणे. येत्या वर्षभरामध्ये असे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि अद्ययावत ग्रंथालय उभे करण्याचे उद्दीष्ट् संस्थेने ठेवले आहे. या कार्यक्रमात मरणोपरांत सेना मेडल मिळविलेल्या शहीद जवान जोतिबा गणपती चौगुले यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या "दौड" मध्ये जागतिक पातळीवरील मॅरेथॉन गाजविणारे कॉम्रेड्स धावपटू, आयर्नमॅन मानांकित अल्ट्रा धावपटू ,मॅरेथॉन रनर्स , उदयोन्मुख धावपटू, तसेच डोंबिवली,कल्याण,ठाणे, पुणे,मुंबई, गोवा,पालघर, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, मध्य प्रदेश, दिल्ली इ. ठिकाणचे जवळजवळ ३५० धावपटू, त्याचबरोबर डॉक्टर,इंजिनिअर,उद्योजक, निवृत्त अधिकारी असे समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी होणार आहे. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार ते म्हणजे तब्बल 40 नेव्ही ऑफिसर्स गेटवे पासून डोंबिवली पर्यंत धावणार आहेत.