team jeevandeep 05/05/2025 sthanik-batmya Share
शहापूर /राजेश जागरे
मुलांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
उत्तरकार्याला पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना भांडी किंवा कपडे वाटप करण्याची प्रथा आहे.या अनाठायी खर्चाला पायबंद बसला पाहिजे, चुकीच्या प्रथा पडू नयेत यासाठी उत्तरकार्यादिवशी भांडी, कपडे वाटपाला फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत विविध जातींची २०० रोपे भेट देण्याचा विधायक उपक्रम शहापूर तालुक्यातील मलेगाव येथील जनार्दन पडवळ व अशोक पडवळ यांनी वडील जयराम पडवळ यांच्या उत्तरकार्य कार्यक्रमावेळी राबवण्यात आला.
दरम्यान पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन, वाढते तापमान, घटते पर्जन्यमान, जमिनीची होत असलेली धूप, खोलवर जात असलेली भूजल पातळी हे शेतशिवारातील घटत चाललेली झाडांची संख्या तसेच कमी होत असलेले वनक्षेत्र यांचेच दुष्परिणाम आहेत.पर्यावरण संतुलनासाठी ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे.आपल्या राज्यात मात्र हे प्रमाण २० टक्के सरकारी आकडेवारीनुसार सांगितले जाते. प्रत्यक्षात ते प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास असल्याचे यातील जाणकार सांगतात. पर्यावरण असंतुलनाचे सर्व दुष्परिणाम कमी करावयाचे असतील तर वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन हाच परिणामकारण उपाय आहे. केवळ वन जमिनी, शासकीय पडीक जमिनी, रस्त्याच्या दुतर्फा यावरच झाडे लावून चालणार नाही तर शेताचे बांध, शेतकऱ्यांकडील पडीक जमीन, खासगी पडीत क्षेत्र यावरसुद्धा वृक्ष लागवड केल्यास झाडांची संख्या वाढून त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागतील.
# प्रतिक्रिया #
झाडे आपल्या संरक्षणासाठी आवश्यक आहेत.या वर्षात प्रचंड उष्णता तसेच पूर आणि चक्रीवादळांमुळे झालेल्या विनाशा याचा थेट संबंध पर्यावरणाशी येतो.जैवविविधता राखण्यासाठी झाडे खूप आवश्यक आहेत.परिणामी माती आणि भूजलाचे आरोग्य सुधारून ते अधिक वाढीसाठी पर्यावरणाचे पोषण करतात.किंबहुना वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली आहे.यासाठी एक सामाजिक चळवळ उभी राहणे अत्यावश्यक आहे.- दर्शन ठाकुर,वनपरीक्षेत्र अधिकारी,धसई.