team jeevandeep 02/03/2025 sthanik-batmya Share
सदर महा स्वच्छता अभियानात तब्बल २७३४ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला
बोरघर / माणगाव : रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण ति. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ति. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ति. डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी, ति. डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने देशभरात महास्वच्छता अभियान मोहिमेला सुरुवात करण्यात आली. धर्माधिकारी यांची कर्मभूमी असलेल्या रायगड जिल्हयासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोप-यातून रविवारी सकाळी ९.०० वाजता या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
हजारो श्री सदस्य प्रत्येक गाव, खेडयात व शहरात ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता करताना पाहायला मिळाले. माणगांव नगरपंचायत व ग्रुप ग्राम पंचायत गोरेगांव येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
माणगाव शहरात या स्वच्छता अभियानामध्ये १५२० श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. माणगावमधील तहसिल कार्यालय परिसर, प्रांत कार्यालय, पोलिस स्टेशन, कचेरी रोड, बाजारपेठ, मुंबई गोवा हायवे, निजामपूर रोड, उपजिल्हा रुग्णालय, मोर्बा रोड, जिल्हापरिषद शाळा, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसर, महाराण प्रताप नगर रस्ता, पंचायत समिती, स्मशान भूमी आणि मच्छी मार्केट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्रीसदस्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा व प्लास्टिक बाटल्या उचलून परिसर स्वच्छ केला. तसेच गटारामधील ओला कचरा सुद्धा स्वच्छ करण्यात आले. यासाठी एकूण २२ वाहनांचा वापर करुन २८ टन ओला आणि ४४ टन सुका असा एकूण ७२ टन कचरा उचलण्यात आला. माणगांव नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन वाढवळ, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, माजी नायब तहसिलदार सुरेश वाढवळ, नगरपंचायत स्वच्छता प्रमुख अतुल जाधव व प्रांत कार्यालय महसुल सहाय्यक दिनेश पाचाडकर तसेच इतर संघटनांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच ग्रुपग्रामपंचायत गोरेगाव हद्दीत १२१४ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानामध्ये ग्रुप ग्रामपंचायत गोरेगावचे प्रांगण, गोरेगाव पोलिस स्टेशनचा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव बस स्थानक, विष्णू तलाव गोरेगाव, गाव तलाव गोरेगाव, रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा, रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा, ए. के. आय. हायस्कूल, बौध्द विहार, मस्जिद आणि स्मशानभूमीतील परिसर स्वच्छता करण्यात आली. यासाठी एकूण १० वाहनांचा वापर करुन १४ टन ओला आणि २४ टन सुका असा एकूण ३८ टन कचरा उचलण्यात आला. यावेळी गोरेगांव ग्रामपंचायत सरपंच जुब्बेर अब्बासी व इतर मान्यवर उपस्थित होते. माणगांव नगरपंचायत व ग्रामपंचायत गोरेगांव महा स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरिता एकूण २७३४ श्रीसदस्य सहभागी झाले होते. एकूण दोन्ही मिळून ४२ टन ओला कचरा व ६८ टन सुका कचरा उचलण्यात आला.