team jeevandeep 08/05/2025 sthanik-batmya Share
भिवंडी :
मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सेवा प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त प्रसाद शिंगटे तसेच इतर मान्यवर अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका सध्या ६५ शासकीय सेवा नागरिकांना वेळेत, पारदर्शक व उत्तरदायित्वाने देत आहे. या अधिनियमाच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त, महानगरपालिकेने नागरिकांना सेवा प्रमाणपत्र आणि उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या कार्यक्रमात विविध विभागांतील सेवा प्रमाणपत्रांचे वितरण आयुक्त तथा प्रशासक राधाविनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, कर विभाग प्रमाणपत्र, अग्निशमन विभाग प्रमाणपत्र, नगररचना विभाग यांचा समावेश आहे. तर मिरा भाईंदर महानगरपालिकेत अधिकारी कर्मचारी यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अशा प्रकारे एकूण मिळून 122 प्रमाणपत्राचे वाटप महाराष्ट्र लोकसेवा हक्क पंधरवडा निमित्त करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश केवळ प्रमाणपत्र वाटप नव्हे, तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील पारदर्शकता, विश्वास, संवाद आणि सेवाभाव वृद्धिंगत करणे हा आहे. आजच्या प्रमाणपत्र सोहळयात विवाह नोंदणी विभाग (प्रभाग ४) डॉ. नंदकिशोर लहाने – उपनिबंधक, श्रीमती संगीता पाठक – लिपिक व बालवाडी शिक्षिका, श्रीमती रविना गावंड – संगणक चालक, मालमत्ता विभाग (प्रभाग ३) श्री. दत्तात्रय वरकुटे – सहा. आयुक्त, श्री. प्रशांत पाटील – कर निरीक्षक, श्री. भरत राऊत – लिपिक, परवाना विभाग (प्रभाग ३) श्री. किरण जाधव – लिपिक, श्रीमती रेखा पाटील – लिपिक, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत मिरा भाईदर महानगरपालिकेच्या सेवा आणि सुविधा ऑनलाईन करण्याचे मुख्य काम माहिती व तंत्रज्ञान विभागाने उत्तमरित्या केल्यामुळे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी श्री. राजकुमार घरत यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवुन अहवाल प्राप्त करत प्रत्येक महिन्याचा मासिक अहवाल शासनाला सादर केल्यामुळे सामान्य प्रशासन विभागातील श्री. सुनील यादव – सहा. आयुक्त, श्री. उन्मेष नाईक लिपिक, श्री. हेमंत धुरी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
प्रमाणपत्र वितरणानंतर आयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त करताना, प्रमाणपत्र प्राप्त सर्व नागरिकांचे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करणार असुन लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विहित मुदतीत तक्रारारींचा जलद निपटारा करुन जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याचे उत्तम काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात येईल. असेही नमूद केले.