Team jeevandeep 01/05/2025 sthanik-batmya Share
शहापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर प्रादेशिक विभागातील वनविभागाच्या कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उप वनसंरक्षक, शहापूर (प्रादेशिक) श्री.दीपेश मल्होत्रा (भा.व.से.) यांच्या शुभहस्ते विभागातील वर्ग तीन व चार मधील उत्कृष्ट आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या प्रेरणादायी सोहळ्याला वनविभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अभिजीत पिंगळे, कार्यालय अधीक्षक अक्षदा पाटील यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.
श्री.मल्होत्रा यांनी आपल्या मनोगतातून सर्व सन्मानित कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांच्या समर्पित वृत्तीमुळेच विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडते. तसेच, इतरांनाही यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रथम क्रमांक: लेखापाल जितेंद्र वाघ, द्वितीय क्रमांक: मुख्य लेखापाल अजयकुमार सांगळे व तृतीय क्रमांक: प्रशांत मेंगाळ यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या सन्मान सोहळ्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या कामाची दखल घेतली गेल्याने कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.