team jeevandeep 08/04/2025 sthanik-batmya Share
बदलापूर:
बदलापुरात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. एमआयडीसीच्या बारवी धरणातूनही पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर काही छोटी धरणेही उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात बदलापूर पाण्याबाबत स्वयंपूर्ण शहर होणार असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला.
बदलापुर पूर्वेकडील कात्रप भागात उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे रामनवमीचे औचित्य साधून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी बदलापूर पाण्याबाबत स्वयंपूर्ण शहर होणार असल्याचा दावा केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे, बदलापूर शहराध्यक्ष शरद तेली, माजी नगरसेवक किरण भोईर, स्वामी डार्विन, नरहरी पाटील स्थानिक माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मारुती पाटील, आदित्य पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता कांबळे, अंबरनाथ विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते. कात्रप भागात उभारण्यात आलेल्या या जलकुंभामुळे २० लाख लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.जलकुंभ उभारण्यासाठी जागेपासून अनेक अडचणी होत्या. परंतु त्यावर मात करीत राम नवमीच्या मुहूर्तावर या जल कुंभाचे लोकार्पण झाले असल्याचे कथोरे म्हणाले. येत्या १५ मे पर्यंत कात्रप भागातील किर्ती पोलिस परिसरातील जलकुंभाचे काम पूर्ण होणार असून आणखी १० जलकुंभ प्रस्तावित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बॉक्स:
एमएमआरडीए मार्फत बांधणार छोटी धरणे
एमआयडीसी कडून बारवी धरणाचे ५० एमएलडी पाणी बदलापूरला घेणारच आहोत. त्याचबरोबर एमएमआरडीए मार्फत चिंचवली व नंबरवाडी ही दोन छोटी धरणेही उभारली जाणार आहेत. त्यातून सुमारे २२ एमएलडी पाणी बदलापूरला मिळणार आहे. त्याशिवाय भोज धरणातून १४ ते १५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या धरणांची उभारणी झाल्यानंतर बदलापूरला पुढील ३० ते ४० वर्ष पाणी समस्या भेडसावणार नाही, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.