team jeevandeep 02/03/2025 sthanik-batmya Share
पारनेर तालुका प्रतिनिधी :
लोणी मावळा - पिंपरी जलसेन च्या दत्तकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या लोणी मावळा शाखेचे चोरट्याने शटर तोडून पतसंस्थेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना हाती काही लागले नाही .
पिंपरी जलसेनच्या दत्तकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची लोणी मावळा येथील बस स्थानका जवळ शाखा असून चोरट्याने काल रात्री पतसंस्थेच्या पाठीमागील बाजूस येऊन वीजेच्या मीटरची वायर तोडून तेथे अंधार केला. अंधाराचा फायदा घेऊन पतसंस्थेच्या बाहेर बसविण्यात आलेल्या सी सी टि व्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडल्या व पतसंस्थेच्या दक्षिण बाजूस असणारे शटर लोखंडी हत्याऱ्याच्या साह्याने उचकटून आत मध्ये प्रवेश करून त्यांनी प्रथम सी सी टि व्ही कॅमेरे काढून टाकले व तिजोरी गॅस कटरच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी त्यांना तोडता न आल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पाठीमागे जावे लागले. या पतसंस्थेच्या शेजारीच बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण पतसंस्थाची शाखा असून या पतसंस्थेची देखील मागील काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. राऊत वाडी च्या देवी भोयरे फाटा येथील राऊत बाबा पतसंस्थेच्या मागील बाजूस भिंतीला छिद्र पाडून पतसंस्थेत प्रवेश केला होता . त्या ठिकाणीही तिजोरी न फुटल्याने तेथूनही चोरट्यांना रिकाम्या हाताने जावे लागले होते.
रविवार दि . २ रोजी सकाळी ग्रामस्थ गावात बस स्थानक परिसरात आल्यावर पतसंस्थे त चोरी झाल्याची लक्षात आले. त्यावेळी त्यांनी संस्थेचे शाखाधिकारी राहुल लाळगे यांच्याशी संपर्क साधला असता , त्यांनी संस्थेचे संस्थापक चेअरमन लहुजी थोरात यांना या घटनेची माहिती दिली व त्यांनी पारनेर पोलीसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली व तदनंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल मनिषा चौहान संपत लंके, जालिंदर लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर जागेची पाहणी करून पंचनामा केला . नेहमी प्रमाणे त्यांनी लवकरात लवकर या चोरीच्या घटनेचा तपास लावला जाईल व आरोपी जेरबंद केले जाईल असे , नेहमीच्या पद्धतीचे आश्वासन देवून ग्रामस्थां चे समाधान केले .
पारनेर तालुक्यात चोरीच्या विशेषतः वा इतर घटना घडत असताना पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कर्मचारी करता काय ? अलीकडच्या काळात पारनेर पोलीसांनी एक तरी घटनेचा तपास करून मोठा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतल्याचे उदाहरण दिसून येत नाही . त्यांचे नेहमी प्रमाणे तपास केला जाईल , घटना उघडकीस येईल , मुद्देमाल जप्त केला जाईल , आरोपींना ताब्यात घेतले जाईल , असे थातूर मातूर उत्तर देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो . शेवटी ज्याचे नुकसान होते , त्यालाच सोसावे लागते .