team jeevandeep 23/04/2025 sthanik-batmya Share
जम्मू-कश्मीरमधील रमणीय पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे झालेल्या अमानवी आतंकवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी, ठाणे रेल्वे स्थानक येथे तीव्र निषेध करण्यात आला. निर्दोष पर्यटकांवर धर्म विचारून करण्यात आलेला गोळीबार हे केवळ भ्याड कृत्य नसून, भारताच्या सामाजिक ऐक्यावरील थेट हल्ला आहे. या हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचे बळी गेले असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर जोरदार निषेध नोंदवत, ‘आतंकवादाचा बंदोबस्त करा’, ‘निर्दोषांच्या हत्यांना माफ नाही’ अशा घोषणा दिल्या. उपस्थित नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेत निष्पाप बळींच्या आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे जाहीर केले.
हा हल्ला पुन्हा एकदा स्पष्ट करतो की देशाच्या एकतेला खिळ बसवण्यासाठी अतिरेकी शक्ती सक्रिय आहेत. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ठाणे हे पुन्हा एकदा ठामपणे सांगू इच्छिते की, भारताची एकता, अखंडता, शांततेवर कुणीही आघात करू शकत नाही. आम्ही केंद्र सरकारकडे आणि सुरक्षायंत्रणांकडे मागणी करतो की, या घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि जम्मू-कश्मीरमधील नागरिक व पर्यटक यांच्या सुरक्षेची प्रभावी हमी दिली जावी.