team jeevandeep 02/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड-प्रतिनिधी :
थोर निरूपणकार, महाराष्ट्र भुषण, तिर्थरूप, आदरणीय डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुरबाड शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.मनुष्याच्या अंतकरणात खरी घाण असते ती प्रथम काढली पाहिजे म्हणून नानासाहेबांनी दास बोधासारख्या पवित्र ग्रंथातून आपल्या अमोघ अशा निरूपणाच्या माध्यमातून लाखो श्री सदस्यांच्या मनाच्या अंतकरणातील घाण स्वच्छ केली, त्यांना सन्मार्गाला लावले आहे. त्यांचे हे अलौकिक कार्य आजही पुढे त्यांचे पुत्र तिर्थरूप डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी अधिक जोमाने करत आहेत.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण जगभर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन, रक्तदान शिबिर आयोजित केले जातात. नानासाहेबांच्या जयंतीनिमित्त 2 मार्च 2025 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून संपूर्ण मुरबाड शहरातही स्वच्छता करण्यात आली. सकाळी 8.30 वा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालय, दिवाणी न्यायालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, शास्त्रीनगर तलाव,कुणबी भवन ते बैठक सभागृहासह शहरातील सर्व प्रमुख आस्थापना परिसर व मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यासाठी तालुक्यातील एकूण 1727 श्रीसदस्यांचे 22 गट तयार करण्यात आले होते. यावेळी ओला व सुका असा 38.76 टन कचरा गोळा करण्यात आला. संकलीत झालेला कचरा 15 ट्रॅक्टर, 20 पिकअप मध्ये भरून शहरा बाहेर नेण्यात आला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सदस्यांना पाणी , बिस्कीटे तसेच मास्क, हॅन्डग्लोजची व्यवस्था करण्यात आली होती. या स्वच्छता अभियानात मुरबाड नगरपंचायतचे अधिकारी,कर्मचारी व घंटागाड्यांची मदत झाली.तसेच अभियानात मुरबाड नगरपंचायतचे आजी- माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षा,नगरसेवक यांच्यासह मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते.