team jeevandeep 17/04/2025 sthanik-batmya Share
बोरघर / माणगांव :
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्या तर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयास बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत २५ लाख रुपये किमतीचे विविध वैद्यकीय उपकरणे यांचे वाटप गांधी मेमोरियल हॉल निजामपूर रोड माणगाव येथे घेण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात करण्यात आले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
माणगाव हे मुंबई गोवा राष्ट्रीय महा मार्गावरील तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी प्रशस्त असे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना औषोधोपचारा साठी दाखल करण्यात येते. तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आदी तालुक्यांतून गरीब रुग्ण औषोधोपचारा साठी येत असतात. या ठिकाणी गरिबांना चांगली सेवा मिळावी हा उद्देश नजरे समोर ठेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात काम करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे या माणगाव उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरण यांचे वाटप करण्यात आले. सदरचे उपकरणे रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश मेथा यांच्या कडे तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे, माणगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी,माणगाव उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी श्री.पाचाडकर,उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणालीनी वाढवळ, डॉ.सानप, लता राठोड, परिचारिका शिवकांती गवळी ,शर्मिला गोडबोले,संजय देसाई यांच्या उपस्थितीत श्री सदस्य सुरेश वाढवळ,संदीप खरंगटे,नितीन बामगुडे,नितीन वाढवळ,अपर्णा वाढवळ यांनी केले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माणगाव तालुक्याचे तहसीलदार मा श्री.दशरथ काळे साहेब यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना प्रतिष्ठानने माणगाव उपजिल्हा रुग्णालयास दिलेल्या आवश्यक अशा वैद्यकीय उपकरणांचा गरीब जनतेला निश्चितच याचा फायदा होणार असून हे प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम सामाजिक दायित्वातून समाजासाठी राबवित असल्याचे सांगितले. रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश मेथा यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने माणगाव उपजिल्हा रुग्णालयास वस्तुरूपी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. आम्ही जी यादी दिली होती त्यापेक्षा अधिक साहित्य आमच्या रुग्णालयास प्रतिष्ठानतर्फे देण्यात आले आहे. या रुग्णालयात आपण श्री सदस्यांना जे काही सहकार्य लागेल ते देण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे सांगितले. प्रास्ताविकात बोलताना आदर्श शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी रायगड जिल्ह्यात रेवदंडा येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या रूपाने ज्ञान सूर्य उगवला असल्याचे सांगितले. त्यांच्या गौरवशाली घराण्यातून प्राप्त झालेल्या समाजसेवी वसेचा संकल्प पुढे त्यांनी सिद्धीस नेला. या प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण,मोफत आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर,रक्तगट तपासणी शिबीर,उद्योजकता स्वयंसेवा मार्गदर्शनपर शिबीर,गरजूना श्रवण यंत्राचे वाटप,बस थांबे पाणपोई, निवारा शेड,वनराई बंधारे,विहीर , धरण, तलाव सार्वजनिक पाणवठे स्वच्छता,बोअरिंग,विहीर ,शैक्षाणिक साहित्य वाटप,पोलिसांना साहित्य वाटप,नैसर्गिक आपत्ती वाटप,प्लाजमा डोनेशन शिबीर,स्मशानभूमी परिसर स्वच्छता अशी अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे व लाखो श्री सदस्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी करून उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.