Visitors: 392209
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाण्यात ‘टायर किलर’चा प्रयोग

  Team Jeevandeep      22/09/2024      sthanik-batmya    Share


TYRKLR

ठाणे: रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘टायर किलर’ बसवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे ‘टायर किलर’ बसवण्यात येतील.

घोडबंदर मार्ग आणि अंतर्गत रस्ते वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे ‘टायर किलर’ बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या-त्या भागात दिली जाईल. अशा प्रकारचे ‘टायर किलर’ असल्याची माहिती देणारे बोर्ड १०० ते २०० मीटर आधीपासून लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर मग हे ‘टायर किलर’ बसवले जातील. त्यांच्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल, असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

गेल्या १५ दिवसांत घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्ते यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज, पुन्हा एकदा उपाययोजना तसेच अडचणी याचा विचार करण्यासाठी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते.

या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकाशी समन्वय राखून उपाययोजना केल्याची आल्याची माहिती पंकज शिरसाट यांनी या बैठकीत दिली. तसेच, सध्या असलेल्या अडचणी व त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले.

१२.५ टन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकीबाबत काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली.

दीडशे ते दोनशे टनाच्या गाड्या गायमुख घाटातून जातात, त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो. त्यामुळे येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता यांनी दिली. हा मार्ग आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कापूरबावडी- माजीवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या यु टर्न ते विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रोलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका छोट्या झाल्या असल्याने सेवा रस्ते अधिक सक्षम करावे, अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

सर्व रस्ते खड्डेमुक्त, समान पातळीचे असतील. त्यावर कुठेही उंचवटे तयार होणार नाहीत, याची खात्री सर्व यंत्रणांनी करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, सेवा रस्ते फेरीवाला मुक्त करणे, पार्किंग हटवणे आणि ओव्हरहेड वायरचा बंदोबस्त करणे ही कामे महापालिका यंत्रणा तत्काळ करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

+