team jeevandeep 24/03/2025 sthanik-batmya Share
डोंबिवली : तीन महिन्यांपासून बंद असलेले डोंबिवली पश्चिमेकडील पे अँड पार्क बंद आहे. नागरिकांना आपली वाहने पार्क करण्याकरता अडचण येत असल्याने त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. या तक्रारीवर लक्ष देत सोमवारी पदाधिकारी व शिवसैनिकांनी डोंबिवली रेल्वे प्रबंधक यांना निवेदन दिले. दोन दिवसात रेल्वे हद्दीतील पार्किंग सुरु करा अन्यथा आंदोलन असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
डोंबिवली शहराची लोकसंख्या वाढली तशी वाहनांचीही संख्या वाढली. मात्र शहरातील वाहन पार्किंग समस्या जाणवत असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासनाने व रेल्वे प्रशासंनाने यावर पे अँड पार्क अशी सुविधा उपलब्ध करून दिली. डोंबिवली पश्चिमेला स्टेशन बाहेर रेल्वे प्रशासनाने पे अँड पार्क सुरु केले होते. मात्र नियम मोडून वाहनचालकांकडून पार्किंगचे जादा पैसे घेतले जात होते. मनसेच्या आंदोलनानंतर ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी आपली चूक मान्य करून काही वाहनचालकांना जास्तीचे पैसे परत केले. यावेळी रेल्वे सुरक्षा बल जवानांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना सरकारी दरपत्रक लावावे असे सांगितले होते. त्यानंतर येथील पे अँड पार्क बंद झाले. 4 जानेवारी रोजी मनसेच्या आंदोलनानंतर नागरिकांना न्याय मिळाला पण पार्किंग सुविधा बंद झाली. आधीच डोंबिवली शहरात वाहतुकीचे बारा वाजले असताना त्यात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या जाणवत आहे. आता पे अँड पार्क सुविधा बंद आणि नो पार्किंग मध्ये वाहने उभी केल्यास दंङ भरावा लागतो अशी अवस्था वाहनचालकांची झाली होती. यावर नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आपली समस्या मांडली. समस्या ऐकून कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी डोंबिवलीत शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, विभागप्रमुख शाम चौगले, राजेंद्र सावंत, प्रकाश कदम, मंदार निकम, ऋतूनिल पावस्कर, शेखर चव्हाण, प्रिया दांडगे, सायली जगताप सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली रेल्वे प्रबंधकाची भेट घेऊन दोन दिवसात रेल्वे हद्दीतील पार्किंग सुरु करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला.