team jeevandeep 24/03/2025 sthanik-batmya Share
डोंबिवली : ८८ वर्षांचा गौरवशाली वारसा लाभलेल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट (G.E.I.), डोंबिवली शाखेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २३ मार्च २०२५ रोजी स. वा. जोशी संकुल, डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शाळेला संस्थेचे माजी कार्यवाह व कोषाध्यक्ष कै. अ. कृ. दीक्षित यांचे नाव देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या नामफलकाचे उद्घाटन आणि संस्थेचे आद्य संस्थापक कै. गो. ना. अक्षीकर तसेच कै. अ. कृ. दीक्षित यांच्या प्रतिमेच्या अनावरणाने झाली. हे उद्घाटन मा. डॉ. संजय देशमुख (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त या. डॉ.इंदुराणी जाखड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, कल्याण-डोंबिवली महानगरपािकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, विशेष अतिथी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू मनीषा कापरेकर डांगे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्य, पूर्व प्राथमिक विभागाचे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक , शाळेच्या मुख्याध्यापिका समता पावसकर, दीक्षित कुटुंबीय व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
विविध उपक्रमांचे उद्घाटन झाले :
फोटो गॅलरीचे उद्घाटन – श्रीराम शिधये(माजी विद्यार्थी व सहसंपादक महाराष्ट्र टाइम्स)
ग्रंथालयाचे उद्घाटन – नितीन दळवी (उद्योजक व माजी विद्यार्थी) यांच्या हस्ते झाले.
खेळणी घराचे उद्घाटन-पालक प्रतिनिधी सौ.प्राजक्ता लोध यांच्या हस्ते झाले.
१९७१ च्या माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत आनंद घैसास यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेलिस्कोप शाळेला भेट दिला.
दीक्षित कुटुंबीयांचा सन्मान कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी कै. अ. कृ. दीक्षित यांचे सुपुत्र अभय दीक्षित आणि श्रीमती परांजपे यांनी या प्रसंगी भावनाविवश होत काही आठवणींना उजाळा दिला आणि संस्थेने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दीक्षित सरांच्या शेवटच्या काळात मोहन शिंदे, राजाराम गोरीवले व संतोष दळवी या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली त्यामुळे त्यांचाही सत्कार शाळेतर्फे करण्यात आला.
कुलगुरूंनी आपल्या मनोगतात शाळेच्या उपक्रमशीलतेचे व संस्थेच्या कार्याचा गौरव करत कौतुक केले. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण (NEP), शिक्षण पद्धती, आणि मातृभाषेतून शिक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या ऐतिहासिक क्षणाने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कार्यास नवसंजीवनी मिळाली असून, कै. अ. कृ. दीक्षित यांचे कार्य व स्मृती विद्यार्थ्यांच्या मनात सदैव प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.