TEAM JEEVANDEEP 06/03/2025 sthanik-batmya Share
कल्याण :
8 मार्च रोजी दरवर्षी कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत महापालिकेच्या नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महिला दिन साजरा केला जातो. यावर्षी मात्र महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या संकल्पनेनुसार या पारंपारिक पध्दती ऐवजी "ऊर्जा-उत्सव उन्नतीचा" या टॅग लाईनखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका व सिटी पार्क मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एका आगळ्यावेगळ्या अभिनव पध्दतीने महिला दिनाचे आयोजन कल्याणच्या गौरी पाडा येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य वातावरणात सायं. 5 ते रात्री 9 या वेळेत करण्यात आले आहे.
8 मार्च, रोजी महिला दिनी सायं. 5 वाजता सिटी पार्कमध्ये प्रवेशोत्सुक महिलांचे अभ्यागतांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले जाईल. महिलांसाठी नेल आर्ट, मेहंदी यांचे विनामुल्य स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांसाठी हिमोग्लोबीन, बोन डेन्सिटी, रॅन्डम शुगर या चाचण्या तज्ञ डॉक्टरांमार्फत निशुल्क करण्यात येणार असून, हिमोग्लोबीनच्या कमतरतेसाठी औषधे देखील पुरविली जाणार आहेत. महिलांसाठी झुंबा डान्स आणि योगाचे तसेच नृत्याचे देखील सादरीकरण केले जाणार असून "आई आणि मुलगी" यांच्या जोडगोळीचा रॅम्प वॉक देखील आयोजित करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे महिलादिनी कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी लाईव्ह म्युझिकची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित तज्ञ डॉक्टरांची महिलांच्या आरोग्य विषयक बाबींबाबत प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच आरोग्य समस्यांविषयक संबंधित डॉक्टर वर्गास प्रश्न विचारण्याची संधी देखील निवडक महिलांना प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमात "आर्ट ऑफ लिविंग” बाबत महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, कल्याण-डोंबिवली नगरीतील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या काही महिलांना सन्मानित केले जाणार आहे.
महिलांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंटस् उभारण्यात येणार असून, क्षुधाशांतीसाठी विविध खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉल्सची रेलचेल असणार आहे. पै फ्रेन्डस् वाचनालयामार्फत महिलांशी निगडीत विषयांबाबत पुस्तक प्रदर्शनाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत.
जागतिक महिला दिनी संपन्न होणाऱ्या या "ऊर्जा- उत्सव उन्नतीचा" अर्थातच महिला दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहून, महिलांनी सहभागी होवून कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.