team jeevandeep 11/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : जनहित याचिका क्रमांक 155/2011 मधील मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, झेंडे आणि होर्डिंग काढण्याची तीव्र मोहिम राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिले होते. त्याअनुषंगाने डिसेंबर 2024 मध्ये 1085 पोस्टर, 2867 बॅनर, 19 होर्डिंग, 246, झेंडे काढण्यात आले आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात बॅनर लावण्यासाठी परवानगीचे अधिकार संबंधित प्रभागाचे सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. 1 जानेवारी 2025 पासून अनधिकृत बॅनर लावणाऱ्या 27 जणांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, 1995 च्या तरतुदीचे उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, झेंडे आणि होर्डिंग काढण्याची कार्यवाहीची मोहीम सुरू राहणार आहे.
तरी नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी महापालिका परिक्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात बॅनर लावण्यासाठी संबंधित प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून परवानगी घेण्यात यावी, असे आवाहन अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपआयुक्त अवधुत तावडे यांनी केले आहे.