TEAM JEEVANDEEP 17/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपास सुरू असणारी मोठ्या प्रमाणावरील पायाभूत विकासकामे आणि विशेषतः कल्याणच्या आसपास वेगाने सुरू असणारे महत्त्वाकांक्षी एक्स्प्रेस वेचा विचार करता कल्याणला मेजर कनेक्टिव्हिटी हबचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवीन घरं घेण्यासाठी कल्याणला पसंती मिळत असून येत्या काळात हे मुंबई ठाण्यानंतरच सर्वात मोठं शहर बनेल असा विश्वास एमसीएचआयच्या पत्रकार परिषदेत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला.
येत्या 23 जानेवारीपासून कल्याणात क्रेडाई एमसीएचआयचे 14 वे प्रॉपर्टी एक्स्पो भरणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्याणातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांनी या एक्सपोची या शहराचे भविष्य, भविष्यातील गरजा आणि अस्तित्वातील अडचणी यांच्यावरही प्रकाशझोत टाकला.
क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवलीमार्फत गेल्या १४ वर्षांपासून जनतेला परवडतील अशी त्यांच्या स्वप्नातील घरं देण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये यंदा 50 हुन अधिक नामांकित विकासकांचे 150 हून अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान लालचौकी येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे १४ वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुर, टिटवाळा, शिळफाटा, ठाणे परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १६ लाखांपासून ते थेट 2 करोडापर्यंत किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध असणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली. तसेच गेल्या वर्षाचा अंदाज बघता या प्रदर्शनाला २५ हजाराहून अधिक नागरीक भेट देतील असा अंदाज आहे. त्याशिवाय प्रत्येक तासाला लकी ड्रॉ आणि स्पॉट बुकिंग डिस्काउंट अशी विविध बक्षिसे जिंकण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.
या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश (बाळयामामा) गोपीनाथ म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राजेश मोरे, आमदार किसन कथोरे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष राजेश गुप्ता आणि सचिव सुनील चव्हाण यांनी दिली.