team jeevandeep 28/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासमवेत त्यांच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण पूर्व मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तसेच नागरिकांच्या तातडीच्या समस्या यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये "यू-टाईप" रस्ता तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका बाधित नागरिकांचे पुनर्वसन करून रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. चिंचपाडा, आशेळे, द्वारली, माणेरे, नांदिवली आणि वसार या भागातील पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई आणि 100 फुटी रोड लगतच्या भूखंडाचे अधिग्रहण करून आधुनिक रुग्णालय व क्रीडासंकुल उभारणीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याचे ठरवले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार गायकवाड यांनी केली. कल्याण पूर्वेतील सर्व जलस्रोत व नाले स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. यावर आयुक्तांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अनधिकृत बांधकामांना आश्रय दिला जाणार नाही आणि त्यावर तत्काळ तोडक कारवाई केली जाईल. प्रशासनातील कोणताही अधिकारी, कर्मचारी जबाबदारी पार पाडत नसेल, तर त्यांच्यावर कडक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
दरम्यान ही बैठक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरली असून, यामुळे लवकरच विकासकामांना गती येईल. प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांच्या समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वास आमदार सुलभा गायकवाड यांनी व्यक्त केला.