TEAM JEEVANDEEP 17/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील ३ गुन्हेगारांना २ वर्षे कालावधीसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश अभिमान गवळी वय ३३ वर्षे, शाम अभिमान गवळी वय ३४ वर्षे व नवनाथ अभिमान गवळी वय २८ वर्षे, सर्व राहणार नंदादीप अर्पा., नंददीप नगर, चक्कीनाका, कल्याण पुर्व यांच्यावर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे असे शरीरा विरुध्द् व मालमत्तेचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल होते. या इसमांनी कल्याण पुर्व चक्कीनाका परीसरात लोकांवर दहशत निर्माण केली असल्याने ते तेथे कोणालाच घाबरत नसुन त्यांच्या गुन्हेगारी कारवाया करत असतात. व ते लोकांवर दादागिरी करत असतात.
त्यामुळे या तीनही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव कोळसेवाडी पोलीस ठाण्याकडुन पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ कल्याण यांना सादर करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी हा प्रस्ताव मंजुर करून या तीनही गुन्हेगारांना पुढील २ वर्षे कालावधी करीता ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व रायगड या जिल्हयांतुन तडीपार केले असुन कोळसेवाडी पोलीसांकडुन या गुन्हेगारांना तडीपारीची नोटीस बजावुन त्यांना सातारा येथे सोडण्यात आले आहे.
अशा प्रकारचे धोकादायक व सक्रीय गुन्हेगार यांची कोळसेवाडी पोलीस ठाणे यांनी यादी तयार केली असुन नजीकच्या काळात आणखी अशाप्रकारे सक्रीय असणाऱ्या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कडक प्रतिबंधक कारवाई करून एम.पी.डी.ए. कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपार करण्यात येणार आहे.