team jeevandeep 13/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सन १९९७ ते २००० या कालावधीत दाखल झालेल्या बसेस विहित आर्युमान ८ ते १० वर्षे पुर्ण झाल्यामुळे शासकीय नियमानुसार गणेश घाट आगारात उभ्या होत्या. या बसेसमुळे गणेश घाट आगारात बहुतांश जागा व्यापली गेली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार सन २०२३-२०२४ मध्ये या बसेसची निर्लेखन प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली होती. अखेर जानेवारी २०२५ मध्ये केडीएमसी आयुक्तांच्या मान्यतेने आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मुल्यांकन करुन दिल्या प्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निर्देशानुसार १५ वर्षापेक्षा जास्त आर्युमान असलेल्या ३४ बसेस व ३ लहान वाहने असे एकूण ३७ वाहने मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन मुंबई, या केंद्र शासनाच्या उपक्रम संस्थेद्वारे निर्लेखित करणेची प्रक्रिया करण्यात आली.
हा लिलाव ऑनलाईन पध्दतीने पार पाडण्यात आला. या अंतर्गत बसेसची लिलाव प्रक्रिया तीन लॉटमध्ये करण्यात आली होती. या बसगाडया दिनांक २२ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत इच्छुक खरेदीदारांसाठी तपासणी व अवलोकनासाठी गणेश घाट आगार येथे उपलब्ध होत्या. दिनांक ४ फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया कार्यन्वित करण्यात आली. लिलाव प्रक्रियेकरीता उप प्रादेशिक कार्यालयाने निर्धारित करुन दिल्याप्रमाणे बस गाडयांचे किमान आधारभूत मुल्य रुपये ५३ लाख ३८ हजार इतके होते. प्रत्यक्षात लिलाव प्रक्रियेअंती रुपये ८३ लाख ९२ हजार ७५८ इतकी रक्कम प्राप्त झाली.
तरी गणेश घाट आगार येथील बऱ्याच कालावधीपासून निर्लेखनासाठी प्रस्तावित असलेल्या बसेसपैकी ३४ बसेस अधिक ३ लहान वाहने असे एकूण ३७ वाहने निर्लेखन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आगारात बसेस पार्किंग करीता तसेच बस गाड्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होईल. मुख्यमंत्री कार्यालयाकडील १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्या अंतर्गत स्वच्छता या मुद्दयांवर या उपक्रमाची नोंद घेता येईल अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी दिली.