team jeevandeep 31/03/2025 sthanik-batmya Share
शहापूर :
ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी दरवर्षी केंद्रीय जवाहर नवोदय समिती मार्फत इयत्ता सहावी व इयत्ता नववीसाठी निवड चाचणी घेण्यात येते. नुकतेच निवड चाचणीचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून पहिल्या निवड यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातून २३ विद्यार्थ्यांपैकी पैकी शहापूर तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अस्नोली शाळेच्या तब्बल चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी प्रवर्गातील आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो. या विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून दरवर्षी जवळपास दहा हजार विद्यार्थी परीक्षा देतात. नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावी साठी शहरी भागातून २५ टक्के तर ग्रामीण भागातून ७५ टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
अस्नोली शाळेच्या दिव्या राजेश देसले, दर्शना दिलीप बांगारे, गौरांगी उमेश घोडविंदे, चैतन्या बाळाराम म्हसकर या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे. अतिशय स्पर्धात्मक अशा परीक्षेची वर्षभर तयारी करून उज्वल यश संपादन केल्यामुळे वर्गशिक्षक पुरुषोत्तम ठाकरे मुख्याध्यापक विजय पाटील, सहशिक्षक राजेंद्र सापळे,नवनित फर्डे,गणेश हरड, बाळू भेके यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे तसेच गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी विशेष कौतुक केले आहे.