team jeevandeep 08/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : ठाकुर्ली येथील 90 फुट रोडवरील लक्ष्मी पार्क येथे असणाऱ्या पूजा ज्वेलर्स या सोनाराच्या दुकानावर चोरांनी डल्ला मारला असून दुकानातील दोन लाख 74 हजार 800 रुपयांच्या चांदीचे दागिने आणि वस्तूंची चोरी केली आहे. याबाबत दुकानमालक रोशन सोनी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रोशन सोनी हे आपले पूजा ज्वेलर्स हे दुकान गुरुवारी रात्री बंद करून घरी गेले. सकाळी त्यांच्या दुकाना शेजारी असलेल्या मिठाई दुकानाच्या मालकाने ज्वेलर्स दुकानाचे शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी याबाबत सोनी यांना फोनवर कळवले असता सोनी हे लागलीच आपल्या दुकानात आले. यावेळी दुकानातील सोन्याचे दागिने हे लोखंडी तिजोरीत ठेवले असल्याने चोरांना ते चोरता आले नाही. मात्र चोरांनी काउंटरवर ठेवलेले चांदीचे दागिने आणि वस्तु लंपास केल्या असून त्यांची किंमत दोन लाख 74 हजार 800 रुपये आहे. याबाबत टिळक नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.