team jeevandeep 21/04/2025 sthanik-batmya Share
पेण ( प्रतिनिधी)
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीवरील बंदी मुळे पेण शहरासह ग्रामीण भागातील हमरापूर विभागातील गणेश मूर्तीकारांची मोठी कोंडी होत आहे. प्लास्टरच्या मूर्त्यांबाबत संभ्रम कायम असल्याने तयार झालेल्या लाखो गणेशमूर्त्यांचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या विघ्नहर्त्या वरच पिओपी बंदी चे महा 'विघ्न' आले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला मूर्ती पुरविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पेणकर गणेशमूर्तीकारच मानसिक तणावाखाली दिसत आहेत.
पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवे, दादर, उंबर्डे, शिर्कि, गडब व आसपासच्या परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. पेण शहर आणि हमरापूर जोहे परिसरात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या पाचशेहून अधिक कार्यशाळा आहेत. ज्यामधून दरवर्षी सुमारे ३० लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. नंतर त्या देशाविदेशात पाठवल्या जातात. दरवर्षी या व्यवसायातून ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. या व्यवसायामूळे २५ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. राज्यात लागणाऱ्या एकूण गणेशमूर्तीपैकी जवळपास ६० टक्के गणेशमूर्ती संपूर्ण पेण तालुक्यात बनविण्यात येत असून त्या तयार केल्या जातात.
दसऱ्याच्या शुभमुहूर्ता पासून दहा ते पंधरा दिवसांनी पेण मध्ये गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरूवात होते. हे काम वर्षभर सुरू असते. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. हमरापूर जोहे व पेण शहर परिसरात लाखो पिओपीच्या गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. त्यांचे रंगकाम, गोल्डन आणि आखणी शिल्लक आहेत. मात्र कोर्टाने आदेश दिलेल्या पिओपी मूर्तीवरील बंदीमूळे आता तयार झालेल्या गणेशमूर्तीचे करायचे काय? हा गंभीर प्रश्न पेणसह राज्यातील मूर्तीकारांना भेडसावत आहे.
पीओपी गणेशमूर्तीसाठीच पेणचे मूर्तिकार आग्रही का....
पिओपीच्या गणेशमूर्ती या टिकाऊ आणि वजनाला हलक्या असतात. कमी वेळात जास्त मूर्ती तयार करणे सहज शक्य होते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी पीओपीच्या गणेश मूर्ती उपयुक्त ठरतात. मूर्तीची सुबकता चांगली असते. किमतीलाही या मूर्ती शाडूच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत अर्ध्या किमतीत म्हणजे खूप स्वस्त पडतात, मातीच्या गणेशमूर्ती या वजनाला जड, हाताळायला नाजूक आणि बनवायला अधिक परिश्रमाच्या असतात. पिओपीच्या तुलनेत शाडूची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा वेळही जास्त असतो.
कोर्टाने व शासनाने पिओपी गणेश मूर्तीवरील बंदी हटवावी अशी मागणी गणेशमूर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे .