शतदिवसीय कार्यालयीन सर्वेक्षणात उल्हासनगर मनपा आयुक्त सरस
शतदिवसीय कार्यालयीन सर्वेक्षणात उल्हासनगर मनपा आयुक्त सरस
Team jeevandeep
01/05/2025
sthanik-batmya
Share
उल्हासनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन, स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा समावेश होता. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. गेल्या शंभर दिवसात राज्य सरकार मधील मंत्र्यांनी काय कामगिरी केली याचं निकालपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलीय.
या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची निवड करण्यात आली.१०० दिवसांच्या कार्यक्रमातील निकालात सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी १०० पैकी ८६.२९ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती दिली आहे.त्यांनी यासंदर्भात तशी एक पोस्ट शेअर केली आहे.
विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाल्यावर, आयुक्त पदाचा पदभार तात्कालीन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.त्यानंतर शासनाकडून पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची आयुक्त पदी नियुक्ती जाहीर केली होती.विशेष म्हणजे १९९६ साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आयुक्त पदावर विराजमान होणाऱ्या मनिषा आव्हाळे ह्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या त्यावेळी त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. आणि आता राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीमेतील निकालात सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून १०० पैकी ८६.२९ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला असल्याने मनिषा आव्हाळे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे उल्हासनगर महानगरपालिकेचा नावलौकिक वाढला असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.