team jeevandeep 31/03/2025 sthanik-batmya Share
कल्याण -
रक्तदान हे जीवनदान देणारे श्रेष्ठदान असून कधी कधी पैसा असूनही ठराविक ग्रुपचे रक्त न मिळाल्याने माणूस हताश होतो असे प्रतिपादन भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी येथे केले .
कल्याण पश्चिम येथील महापालिकेसमोरील स्वामी नारायण हॉल येथे आपलं प्रतिष्ठान ह्या संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी आदरांजली देण्यासाठी रक्तदान शिबिर तसेच सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी साईनाथ तारे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिबिराचे उद्घाटन १०४ वेळा रक्तदान केलेले सुरेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी व्यासपीठावर सर्वश्री अनिल काकडे, विनायक शेणवी, सुरेश रेवणकर , कुमुदिनी देसाई, शकुंतला राय, नयना नायर, वीणा निमकर , अरुणा कदम, सोनल लोहार उपस्थित होते .
यावेळी साईनाथ तारे पुढे म्हणाले कि माणूस प्रसंगी पैसा कुठूनही गोळा करू शकतो मात्र गरज असेल आपल्याला हव्या त्या रक्ताच्या ग्रुपचे रक्त मिळवू शकत नाही . अशावेळी तो पैसा असूनही हताश होतो. म्हणून ज्या ज्या संस्था रक्तदान शिबिर राबवितात त्यांचे कौतुक केले पाहिजे . रक्तदान शिबिर असा उल्लेख करत असतांना रक्तदानाच्या पुढे कंसात जीवनदान असा शद्ध टाकून पुढे शिबिर असे म्हटले पाहिजे असे आपले मत देखिल साईनाथ तारे यांनी यावेळी व्यक्त केले .
रक्तदान शिबिरात नयना नायर आणि त्यांच्या मुलीने रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला . ६५ वर्ष पूर्ण झाल्याने रक्तदान करण्याची इच्छा असूनही रक्तदान करता येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करत शकुंतला राय ह्या ज्येष्ठ महिला कार्यकर्तीने आपली नात आणि जावई यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन दिले . ॲड. अनिकेत सांगळे यांनी रक्तदान करून वकिल, सारिका मांगले यांनी रक्तदान करून शिक्षक तर रश्मी घुले यांनी रक्तदान करून कलाकार देखिल सामाजिक बांधिलकी जपतात हे दाखवून दिले.