team jeevandeep 31/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केली आहे. भिवंडी आणि त्याच्याभोवतीच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुधारणा करण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सरकारकडून आवश्यक निधी आणि योजना मिळवण्यासाठी ते सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.
भिवंडी स्थानकावरून नियमित लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा. भिवंडी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी निधीची तरतूद केली जावी. भिवंडीला राष्ट्रीय महामार्गांसोबत चांगली जोडणी मिळवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जावेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपूल व विस्तारित रस्त्यांचे काम तातडीने सुरू करावेत. शहापूर येथे एक नवीन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मंजूर करावा. भिवंडीमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करावा, जेणेकरून सीबीएसई शिक्षणाची गुणवत्ता वाढवता येईल.
भिवंडीमध्ये ५०० बेडचे अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय सुरू करावे. मेडिकल कॉलेज मंजूर करून भिवंडीला वैद्यकीय शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनवावे. भिवंडीच्या वस्त्र उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी करसवलती, अनुदाने व आर्थिक मदतीच्या योजनांचा लाभ मिळवावा. कामगारांसाठी विशेष कल्याण योजना आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भिवंडी आणि शहापूरसाठी जल जीवन मिशन अंतर्गत अतिरिक्त निधी मंजूर करावा, जेणेकरून प्रत्येक गावाला स्वच्छ पाणीपुरवठा होईल. भिवंडीमध्ये स्मार्ट लॉजिस्टिक पार्क तयार करावा. रेल्वे, रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधांची सुधारणा केली जावी. आदी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख मागण्या सुरेश म्हात्रे यांनी केल्या आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी वाहतूक, शिक्षण, आरोग्य, उद्योग, लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या बजेटमध्ये भिवंडीकरांसाठी आवश्यक योजनांना मंजुरी मिळावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे," असे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.