team jeevandeep 10/05/2025 sthanik-batmya Share
पेण (प्रतिनिधी) :
भारत-पाक सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह रायगड जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मॉक ड्रिल्स राबविण्यात आल्या आहेत. अचानक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्वरित व प्रभावी कारवाई कशी करावी, याचे प्रशिक्षण पोलीस दलास देण्यात आले आहे.
यासोबतच सागरी सुरक्षाही अधिक कडक करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात नाकाबंदी पॉईंट्स उभारण्यात आले असून लँडिंग पॉईंट्स, बेटे व सागरी गावे यांची नियमित पाहणी सुरू आहे. मच्छीमार बांधवांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून, अनोळखी बोट किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील मर्मस्थळांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषत: महत्वाच्या इमारती, सरकारी कार्यालये व गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच सोशल मिडिया देखील प्रशासनाच्या विशेष लक्षात असून, भारत-पाक तणावासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणाऱ्या किंवा द्वेषमूलक कमेंट करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “रायगड पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे,” असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.