team jeevandeep 06/05/2025 sthanik-batmya Share
पेण (प्रतिनिधी) :
राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू असून, यामध्ये अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ही मोहिम १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे शिधापत्रिकाधारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांच्या मुदतीत रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.या शोध मोहिमेत एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका तसेच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्र सरकारकडून शिधापत्रिकेवरील धान्याबाबत लाभार्थ्यांचा इष्टांक ठरविला जातो. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांना या इष्टांकात सामावून घेण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम राबवण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार १ एप्रिल ते ३१ मे या काळात संबंध राज्यभर अपात्र लाभार्थी शोधले जाणार आहेत. यासाठी रास्त भाव दुकानदारांकडून अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या अर्जासोबत शिधापत्रिकाधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. अर्जासोबतच रहिवासाचा पुरावा भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बँकेचे पासबुक, विजेचे बिल, फोन मोबाइल बिल, वाहन परवाना, कार्यालयीन तसेच अन्य ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक दाखला द्यावा लागणार आहे.
अर्जाची तपासणी अधिकाऱ्यांकडून होणार
दुकानदारांनी हे अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. या अर्जाची तपासणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करून रहिवासाचा पुरावा दिलेल्यांची स्वतंत्र यादी तसेच पुरावा न दिलेल्यांची वेगळी यादी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.ज्या लाभार्थ्यांनी पुरावा दिलेला नाही, अशांना तो देण्यासाठी १५ दिवसांत देण्याची मुदत असेल. या मुदतीत पुरावा सादर न केलेल्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.ही तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत.अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करावी.एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
***********
बोगस रेशन कार्डधारकांची शोध मिळून चालू केली असून केवायसी करण्याचे काम जोरात सुरू असून पेण तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांनी रेशनकार्ड बंदच ठेवले आहेत व त्याचा वापर होत नसल्याने अशा२३००शिधापत्रिका रद्द केल्या आहेत.रायगड जिल्ह्यात पेण तालुक्याचे काम अत्यंत सुरळीत चालू असून ते काम लवकरच ९०टक्के काम पूर्ण असून पेण तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे.
पेण तहसीलदार तानाजी शेजाळ
***********
पेण तालुक्यात ३१ मार्च २०२५ अखेर ५०हजार ६०८ रेशनकार्ड असून यामध्ये अंत्योदय ९हजार ५५ अन्नसुरक्षा ३२ हजार ६०४ एन.पी.एच.७हजार ५८३ आणि पांढरे कार्ड १हजार३६६ आहेत या सर्वांचे केवायसी करण्याचे काम चालू असून लवकरच बोगस कार्डधारकांची चौकशी करण्याचे काम सुरू आहे .
पेण पुरवठा अधिकारी यतिराज गरड
***********"