team jeevandeep 24/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माण देशी फाऊंडेशन आयोजित ``माण देशी महोत्सव २०२५’’ हा अस्सल मराठमोळ्या मातीचा महोत्सव 5 फेब्रुवारी पासून परळच्या नरे पार्क मध्ये रंगणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि एच. टी.पारेख फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झिया ललकाका, एचएसबीसीच्या `परोपकार व शाश्वतता’ विभागाचे जागतिक प्रमुख अलोका मजुमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उदघाटन सोहळा गजी नृत्याने सुरू होईल. याच सोहळ्यात माणदेशी महिलांनी 10 लाख महिला सक्षमीकरणाचा मैलाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच मंगळागौर कार्यक्रम सादर केला जाईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता मुलींची माणदेशी कुस्ती आणि बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा पार पडेल. शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता माणदेशी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एचएसबीसीच्या `परोपकार व शाश्वतता’ विभागाचे जागतिक प्रमुख अलोका मजुमदार उपस्थित असतील.
सायंकाळी 7 वाजल्यापासून प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते आपली संगीत रजनी सादर करेल. या कार्यक्रमास प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित असतील. शनिवार, 8 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून अभंग सादरीकरण होईल. तर रविवार, 9 फेब्रुवारी सायंकाळ 5 वाजल्यापासून समारोप सोहळ्यास सुरुवात होईल.
ग्रामीण उद्योजकता, पारंपारिक हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीचे अनोखे मिश्रण असलेल्या या उत्सवाची मुंबईकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान, वेळ - सकाळी १०.३० ते रात्री ९.३० पर्यंत परळच्या नरे पार्क वर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ग्रामीण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन आणि कुस्ती सारख्या लाल मातीतल्या खेळाचा आनंद घेता येईल, अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना गाला सिन्हा यांनी दिली.