team jeevandeep 22/03/2025 sthanik-batmya Share
कल्याण :
जागतिक जल दिनानिमित्त आज डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ, विवेकानंद सेवा मंडळ, ऊर्जा फौंडेशन आणि श्री लक्ष्मी नारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकनगर विद्यामंदिर, स. है . जोंधळे विद्यालय आणि स. वा. जोशी विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांच्या " जल सुरक्षा दिंडी" चे आयोजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने ही दिंडी पार पडली. पाणी या नैसर्गिक संसाधनाचे महत्व याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले. सुमारे ३०० विद्यार्थी तसेच शिक्षक आणि ५० नागरिकांनी यात सहभाग घेतला.
२२ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पाण्याचे महत्त्व आणि त्याचा जपून वापर करण्यासाठी लोकांना आवाहन केले जाते. यंदाच्या जागतिक जल दिनासाठी ' हिमनदी संवर्धन ' ही संकल्पना घेतली गेली आहे. त्यानिमित्ताने गोड्या पाण्याच्या साठयांचे महत्त्व आपण सर्वानी जाणून घेतले पाहिजे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. प्रत्येकाने जाणीवपूर्वक पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न करावा आणि परिसरातील जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखावे यासाठी पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा याप्रसंगी सर्व उपस्थितांना देण्यात आली. तिन्ही शाळांचे विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत, पाणी बचतीचा संदेश देत फडके रोड वरील श्री गणेश मंदिर संस्थान येथे एकत्र आले. श्री गणेशाला वंदन करून पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत माननीय रोहिणी लोकरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पर्यावरण विभाग प्रमुख यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
तत्पूर्वी श्री लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी यांनी गाण्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री गणेश मंदिर संस्थानचे प्रवीण दुधे यांनी गणेश मंदिराच्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली. या जल सुरक्षा दिंडी मध्ये विवेकानंद सेवा मंडळाच्या स्वच्छ डोंबिवली अभियानचे अनिल मोकल व त्यांचे सहकारी, पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवलीच्या रूपाली शाईवाले आणि त्यांचे सहकारी तसेच ऊर्जा फाउंडेशनच्या मेधा गोखले, स्नेहल दीक्षित आणि सहकारी सहभागी झाले होते.