Team Jeevandeep 28/08/2024 mahatvachya-batmya Share
अडीच वर्षांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही पापाची हंडी फोडून राज्यात एक पुण्याची हंडी उभारली, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यातील दहीहंडी उत्सवात बोलताना विरोधकांवर केली. तसेच २०२४ मधील हंडी आम्हीच फोडणार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुक जिंकणार असल्याचा दावा केला.
ठाणे शहरात राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही शहरात अशा दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. यातील स्वामी प्रतिष्ठान, संस्कृती युवा प्रतिष्ठान, टेंभीनाका मित्र मंडळ, संकल्प प्रतिष्ठान, भाजप ठाणे शहर आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून गोविंदांसोबत संवाद साधला. दहीहंडीतील काला हा प्रेमाचा आहे, तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे. हंडी कोणही फोडली तरी कालामात्र सगळ्यांचा आहे. त्यामुळे हा काला सगळ्यांनी प्रेमाने खायचा आहे. हाच संदेश प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला हंडीच्या काल्यातून दिला आहे. आपला समाज एकसंघ ठेवण्याचा हा काला आहे. समाजात प्रेम वाढले पाहिजे म्हणून हा काला आहे. आपल्या शक्ती मिळाली पाहिजे म्हणून हा काला आहे, असे फडणवीस म्हणाले.
टेंभी नाक्यावर जो जोश दिसतोय, तो शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी निर्माण केलेला जोश आहे. हा जोश कसा तयार झाला हे अनुभवायचे असेल तर लवकरच धर्मवीर-२ चित्रपट येतोय, असे फडणवीस म्हणाले. चांगले काम करायला लागलो की पावसाचा आर्शीवाद मिळतो, असे सांगत अडीच वर्षापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही पापाची हंडी फोडून महाराष्ट्रात एक पुण्याची हंडी उभारली. त्यामुळे काळजी करू नका, २०२४ मधली हंडी आम्हीच फोडणार आहोत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.