team jeevandeep 27/02/2025 mahatvachya-batmya Share
सर्वसामान्यांच्या हक्काचे स्वस्तातील घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडामार्फत आता मुंबई आणि कोकण परिसरात वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वस्तीगृह उभारण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
यामुळे हजारो बेघर वृद्धांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार असून त्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळणार आहे. म्हाडा कडून एम एम आर रिजन मध्ये ग्रोथ हब या प्रकल्पांतर्गत मुंबईसह ठाणे, पनवेल, रायगड या भागात येत्या पाच वर्षात तब्बल आठ लाख घरे निर्माण करून वृद्ध नागरिकांच्या निवाऱ्यासोबतच नोकरदार महिलांसाठी देखील हक्काचे घर बांधण्याचा म्हाडाचा मानस आहे.
पहिल्या टप्प्यात म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा, आराम नगर आणि कोकण मंडळामार्फत ठाण्यातील माजीवाड्यातील विवेकानंद नगर परिसरात अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त वृद्धाश्रम उभारण्याचे प्रस्तावित आहे. याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून वृद्धाश्रमात काय सोयीसुविधा असाव्यात या सर्व बाबींचा विचार करून याची रुपरेखा निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यानंतर भविष्यात पुणे, नागपूर, नाशिक मंडळातर्फे देखील वृद्धाश्रम उभारले जातील असे म्हाडा कडून सांगण्यात आले आहे.
नोकरदार महिलांसाठी वसतीगृहेः
व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी वसतीगृहे उभारण्याचे देखील म्हाडाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई उपनगरात १० वसतीगृहे उभारण्यात येणार असून जागेचा शोध सुरु आहे. तर ठाण्यातील माजीवाडा येथे महिलांसाठी एक वसतीगृह उभारण्याचे प्रस्तावित असून या वसतीगृहात एकाचवेळी २०० महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे.