team jeevandeep 24/03/2025 mahatvachya-batmya Share
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन 2024-25 चे सुधारीत रु. 1002,23.80 लक्ष व सन 2025-26 चे रक्कम रु. 1097,49.79 लक्ष रक्कमेचे रु. 9.69 लक्ष शिल्लक दर्शविणारे अर्थसंकल्प मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. रामप्रसाद सोळुंके यांनी मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर यांना आज दि. 24/03/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सादर केला.
मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मा. प्रशासक तथा आयुक्त सो यांना अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले की शहराच्या विकास कामांकरिता निधीची आवश्यता व महानगरपालिकेचे उत्पन्न याचा ताळमेळ घेऊन चांगल्याप्रकारे अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये मुख्य 5-6 विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर यांनी या अर्थसंकल्पातील ठळक मुद्यांकडे प्रामुख्याने लक्ष वेधले.
1. सर्वप्रथम 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने यासाठी येणा-या वर्षाकरिता प्रशासकीय तरतुदीसह सीएसआर फंडातून काही निधी उभारण्याचे प्रयत्न आहेत.
2. शहर सौंदर्याकरण व सुशोभिकरण करणे यासाठी भिवंडी शहरामध्ये मोठा वाव आहे. त्या अनुषंगाने आवश्यतप्रमाणे तरतूद करुन सर्वांच्या सहकार्याने सुशोभिकरणासाठी मोहिम राबविण्यात येणार असून त्याकरिता टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे व त्यांच्या नियमितपणे बैठका घेण्यात येतील.
3. शहर स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे व त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली असून ती वाढविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे.
4. भिवंडी महापालिकेमध्ये कर वसूलीसाठी विशेष लक्ष देण्यात आले नव्हते की जे महापालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत आहे. संपूर्ण प्रशासनाकडून सहकार्य करुन जास्तीत जास्त वसूलीकरिता प्रयत्न करणार जेणेकरुन वसूलीमध्ये वाढ होईल.
5. बीजीपी दवाखान्यामध्ये ओ.पी.डी. सुरु झाली असून त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय सुरु करायचे आहे. याचा मुख्य उद्देश नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील त्याचबरोबर घरी होणारे बाळंतपणाची संख्या कमी होणार आहे.
6. पाणी पुरवठ्याबाबत असे आहे की शहरामध्ये पाणीपुरवठा समप्रमाणात व याग्यप्रकारे होण्यासाठी 100 द.ल.लि. योजना सुरु होणार आहे व ती यशस्वी झाल्यानतर भिवंडी शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल. भुयारी गटार योजना व पाणी पुरवठ्याच्या इतर योजना व सुविधांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
7. शिक्षण विभागाकरिता डिजिटल क्लासरुम शासनाच्या सहकार्याने उभारणे कामीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी तरतूद ठेवलेली आहे.
8. सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्य उद्देश हा आहे की, अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आली आहे त्याचा पूर्णपणे आवश्यकतेनुसार योग्यप्रकारे वापर करणे. अर्थसंकल्पामध्ये पुनर्विनियोजन करण्याची आवश्यकता पडू नये. यासाठी सर्व विभागांनी कामाची आवश्यकता लक्षात घेऊन बिलांसाठी मार्च महिन्याची वाट न पहाता वेळापत्रकानुसार खर्च करुन वेळच्या वेळी कामाची देयके सादर करावीत. अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा त्याची तरतूदीनुसार व योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे हे फार महत्त्वाचे आहे. कामाची आवश्यकता व निकड भासल्यास पुनर्विनियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी सर्वांनी अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार व योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करा
9. कर्मचा-यांच्या सेवा विषयक बाबी परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने ई.एच.आर.एम.एस. आज्ञाप्रणाली विकसित करण्यात येईल.
10. प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून सुव्यवस्थापन व पारदर्शकता येण्याकरिता ई-ऑफिस आज्ञाप्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
11. शहरातील उद्याने व स्मशानभूमी यांचे पर्यावरण पूरक संवर्धन करणे कामीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे
12. शहरातील पदपाथ यांचे सुव्यवस्थापन व सुशोभिकरण करण्यासह वाहतूक व्यवस्था सुनियंत्रित करुन शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरण करणे.
सदर बैठकीस मा. अतिरीक्त आयुक्त (1) श्री. देविदास पवार, अतिरीक्त आयुक्त (2) श्री. विठ्ठल डाके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री. रामप्रसाद सोळुंके, उपायुक्त (मुख्यालय) श्री. रोहीदास दोरकुळकर, उपायुक्त (समाज कल्याण) श्रीमती प्रणाली घोंगे, उपायुक्त (शिक्षण) श्रीमती अनुराधा बाबर, उपायुक्त श्री. विक्रम दराडे, अंतर्गत लेखा परिक्षक श्री. नंदकुमार चौधरी आणि महानगरपालिकेचे सर्व सहायक आयुक्त व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.