Visitors: 228242
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

ताडदेवमधील महिला वसतिगृहाचा प्रस्ताव अखेर राज्य सरकारकडे

  TEAM JEEVANDEEP      28/01/2025      mahatvachya-batmya    Share


मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने ताडदेव येथे नोकरदार, कष्टकरी महिलांसाठी २३ मजली वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०२१ पासून रखडलेला हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. दुरुस्ती मंडळाने आठवड्यापूर्वी ताडदेवमधील महिला वसतिगृहाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी गृहनिर्माण विभागाकडे पाठविला आहे. गृहनिर्माण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर वसतिगृहाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर या वसतिगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या वसतिगृहात नोकरदार, कष्टकरी ८६० महिलांच्या निवाऱ्याची व्यवस्था होणार आहे.

नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक महिला, तरुणी मुंबईत येतात. मुंबईसारख्या महागड्या शहरात या महिला, तरुणींना भाड्याने घर घेणे वा निवाऱ्याची सोय करणे अडचणीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने २०२१ मध्ये मुंबईतील नोकरदार, कष्टकरी महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंडमधील दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले.

म्हाडा प्राधिकरणाच्या २९८ व्या बैठकीत या वसतिगृहाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच प्रकल्पाच्या ६५.८० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र हा प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. आता मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने आठ लाख घरांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात महिला नोकरदार महिलांना निवारा देण्यास प्राधान्य देऊन मुंबईसह राज्यभर महिला वसतिगृह बांधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईतील रखडलेले ताडदेवमधील वसतिगृह मार्गी लावण्याचा निर्णय डिसेंबर २०२४ मध्ये म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतला. या निर्णयानुसार याबाबतचा प्रस्ताव आठवड्याभरापूर्वी गृहनिर्माण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

ताडदेव महिला वसतिगृहासाठी राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर बांधकामासाठी निविदा मागविण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा अंतिम करून वसतिगृहाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच आता लवकरच रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागेल आणि येत्या काही वर्षातच परवडणाऱ्या दरात नोकरदार महिलांना निवाऱ्याची सोय उपलब्ध होईल.

असा आहे प्रकल्प

ताडदेवमधील एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत वसतिगृहाचे बांधकाम

२३ मजली इमारत, २१५ गाळे, ३०० चौरस फुटांचे गाळे

६५.८० कोटी रुपये खर्च

इमारतीच्या तळमजल्यावर पाच दुकाने, दुकानांद्वारे एटीएम, लाँड्री, दवाखाना, औषध दुकान, सलून आदी सुविधा

पहिल्या मजल्यावर उपहारगृह तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर वाहनतळ

चौथ्या मजल्यावर योगासन आणि मनोरंजनासाठी जागा, उर्वरित सर्व मजल्यावर निवासी गाळे

+