team jeevandeep 20/03/2025 mahatvachya-batmya Share
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी (Devendra Fadnavis) विधिमंडळात याबाबत घोषणा केली आहे. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आता राज्य सरकारने या मागणीची दखल घेत सुतार यांना पुरस्कार जाहीर केला आहे.
राम सुतार हे सुप्रसिद्ध भारतीय शिल्पकार आहेत. त्यांचे पूर्ण नाव राम वंजी सुतार असे आहे. धुळे जिल्ह्यातील गोंदूर या खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांचे बालपण अतिशय खडतर आणि संघर्षाच्या स्थितीत गेले. परंतु, लहानपणापासून त्यांना शिल्पकलेची आवड होती. पुढे त्यांना त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. राम सुतार पुढील शिक्षणासाठी मुंबईतील सर जेजे आर्ट ऑफ स्कूलमध्ये आले. प्रतिरुपण व शिल्पकलाविषयक पदविका मिळवली.
खरंतर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार महात्मा गांधी यांच्या मुर्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी यांच्या मूर्ती 50 पेक्षा जास्त देशांत बसवण्यात आलेल्या आहेत. संसद भवनात स्थापित करण्यात आलेली महात्मा गांधी यांचे शिल्पही राम सुतारय यांनीच तयार केले आहे. त्यांनी आतापर्यंत महात्मा गांधींच्या एक हजारांपेक्षा जास्त मूर्ती तयार केल्या आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचे शिल्पही राम सुतार यांनी तयार केले आहेत. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच शिल्प राम सुतार यांनीच डिझाइन केले होते. या शिल्पाच्या निर्माण काळात ते अनेक दिवस गुजरातेतच होते. सध्या राम सुतार केम्पेगौडा येथे एक 90 फूट उंचीची मूर्ती तयार करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळ सभागृहात केली.