team jeevandeep 18/02/2025 mahatvachya-batmya Share
केडीएमसीला प्रतिष्ठित SKOCH म्युनिसिपल गोल्ड पुरस्कार - स्मार्ट गव्हर्नन्ससाठी सन्मान
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सन २००२ पासून ई-गव्हर्नन्स प्रणाली कार्यान्वीत असून विविध पुरस्कारांसोबत सर्वोत्कृष्ट ई- गव्हर्नन्स सोल्यूशन म्हणून सन २००४ आणि सन २०११ मध्ये SKOCH ग्रुपतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अशाच प्रकारे स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी प्रतिष्ठित SKOCH म्युनिसिपल गोल्ड पुरस्कार 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे SKOCH ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते महापालिकेस प्रदान करण्यात आला. हा सन्मान महापालिका आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांनी स्वीकारला. महापालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळत आहेत.
डिजिटल गव्हर्नन्स आणि स्मार्ट सेवा - एक महत्त्वपूर्ण पाऊल या उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व सार्वजनिक सेवा सुधारणा यामध्ये मोठी प्रगती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल वाढ, स्वयंचलित प्रक्रिया, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे यावर भर देण्यात आला आहे.
डिजिटल पेमेंट आणि पारदर्शक व्यवहार प्रणाली यामुळे महसूलात वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करून प्रत्यक्ष सेवा जलद गतीने देता याव्या यासाठी स्वयंचलित प्रक्रीयेचा अवलंब करण्यात येत आहे. सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देऊन अर्ज करणे आणि सेवा प्राप्त करून घेणे हे सहज आणि सुलभ झाले. व्यवस्थापकीय निर्णयांची अचूकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर.
पुरस्कार स्वीकारताना महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी सांगितले की, "हा पुरस्कार केडीएमसीच्या टीमच्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि स्मार्ट सेवांच्या मदतीने आम्ही शहरातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यातही या प्रवासात सातत्य ठेवू." या सन्मानामुळे केडीएमसीच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि प्रशासकीय सुधारणा यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार केडीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.