team jeevandeep 10/05/2025 mahatvachya-batmya Share
ठाणे: प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या दहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेचा अखेर निकाल लागला आहे. आमदार डावखरे यांनी जून 2023 पासून या मुद्याचा सतत पाठपुरावा केला.आमदार डावखरे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचेसोबत अनेक बैठका घेतल्या तसेच पदवीधर कृती समिती आणि इतर शिक्षक संघटनांशी समन्वय साधत या प्रक्रियेला गती दिली.
09 मे 2025 रोजी समुपदेशनाद्वारे या पदोन्नतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यामुळे शिक्षकांचे मनोबल वाढले असून त्यांना किमान 10 वर्षांनंतर त्यांच्या हक्काची पदोन्नती मिळाल्यामुळे समाधान मिळाले. आमदार डावखरे यांच्या प्रयत्नांना शिक्षक, पालक आणि पदवीधर शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच विविध समितीचे पदाधिकारी यांचे सहकार्य या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरले.
या पदोन्नती प्रक्रियेत 90 विज्ञान आणि 40 भाषा शिक्षकांना पदवीधर पदावर पेसा क्षेत्रात नियुक्ती मिळाली. ही प्रक्रिया अनेक तांत्रिक अडचणींमुळे सातत्याने विलंबित झाली होती परंतु आमदार डावखरे यांच्या कटिबद्धतेमुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली. शिक्षकांनी आमदारांच्या निवासस्थानी भेट घेऊन आनंद साजरा केला आणि त्यांचे आभार व्यक्त केले.
.................
“शिक्षकांचे हक्क मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले यावर मला खूप आनंद आहे. हे माझे एक कर्तव्यच होते आणि मी त्यासाठी अखेरपर्यंत लढत राहिलो. शिक्षक हे समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असेल. या प्रक्रियेसाठी विविध शिक्षक संघटनांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हे यश शिक्षकांमुळे आणि त्यांच्या संघर्षामुळे शक्य झाले आहे. यापुढेही मी शिक्षण क्षेत्राच्या भल्यासाठी कार्य करत राहीन.