Visitors: 228102
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

‘MPSC द्वारे मोठी भरती होणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

  team jeevandeep      19/03/2025      mahatvachya-batmya    Share


MPSC Restructuring: राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे अनियमित वेळापत्रक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परिक्षांची तयारी करत असतात. मात्र लोकसेवा आयोगाच्या लालफिती कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम बनवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी लक्षवेधीद्वारे विधानपरिषेदत केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचे कॅलेंडर तयार केले जाणार असल्याचे म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यूपीएससीमध्ये कधी परीक्षा होणार, कधी मुख्य परीक्षा आणि मुलाखत होणार, याचे कॅलेंडर निश्चित असते. पण दुर्दैवाने आपल्याकडे कॅलेंडर तयार केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. २०१८-१९ पासून राज्यात आरक्षणाचे वेगवेगळे निर्णय झालेले आहेत. ईडब्लूएस, एसईबीसीचा विषय पुढे येतो. वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे कधी कधी भरतीमध्ये अधिक वेळ लागतो. पण पुढच्या काळात यूपीएससीप्रमाणे एमपीएससीने कॅलेंडर तयार करण्यावर भर दिला जाईल.एमपीएससीच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीबाबतही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०२३ साली आपण वर्णनात्मक परीक्षा पद्धत आणली होती. पण त्यावेळी विद्यार्थ्यांनी विनंती केल्यामुळे २०२५ पर्यंत जुनीच पद्धत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण २०२५ पासून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा होतील.

वर्णनात्मक पद्धतीचा यूपीएससीसाठी लाभ होणार

तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांचा वर्णनात्मक पद्धतीला पाठिंबा असून काही मोजके विद्यार्थी विरोध करत आहेत. पण हा निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या विद्यार्थ्यांना यूपीएससीमध्ये नुकसान होते. एमपीएससी वर्णनात्मक पद्धतीत असेल तर राज्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससीतही फायदा होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एमपीएससीच्या परीक्षा खासगी संस्थांकडून न घेता आयोगाकडूनच घेण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे ही सर्व कामे एमपीएससीकडूनच होतात. केवळ काही इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरून घेतले जाते. बाकी सर्व कामे आयोगाकडूनच होतात. एमपीएससीने गेल्या काही वर्षात पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवला असून त्यात कोणताही गोंधळ झालेला नाही.

आगामी काळात एमपीएससीद्वारे मोठी भरती

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात रिक्त असलेल्या तीन जागा भरण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. एमपीएससीद्वारे पुढील काळात मोठ्या प्रमाणात भरती राबवली जाणार आहे. ती वेळेत व्हावी, यासाठी सामान्य प्रशासन खात्यामधील सेवा विभागाच्या सचिवांना इतर राज्यांच्या लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासानुसार लोकसेवा आयोगाला नवे स्वरुप दिले जाईल. वर्ग १ आणि वर्ग २ बरोबर आता वर्ग ३ ही आपण एमपीएससीला दिले आहे. सर्व परीक्षा वेळेत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

 

+