team jeevandeep 07/04/2025 mahatvachya-batmya Share
नवी दिल्ली -
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक दणका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या महसूल विभागाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नवे दर आज मध्यरात्री १२ वाजेपासून लागू होणार आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ८७ रुपये प्रति लिटर आहे. या नव्या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट वाढ होईल. आतापर्यंत सरकार पेट्रोलवर १९.९० रुपये आणि डिझेलवर १५.८० रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारत होते. आता ही वाढ झाल्याने पेट्रोलवरील शुल्क २१.९० रुपये आणि डिझेलवरील शुल्क १७.८० रुपये प्रति लिटर होणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती कशावर अवलंबून? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरविण्यासाठी चार मुख्य घटक महत्त्वाचे ठरतातः - कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत - रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे मूल्य -केंद्र आणि राज्य सरकारांचे कर - देशातील इंधनाची मागणी भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कसे ठरतात? जून २०१० पर्यंत पेट्रोलचे दर सरकार ठरवत असे आणि दर १५ दिवसांनी त्यात बदल होत असे. मात्र, २६ जून २०१० पासून सरकारने पेट्रोलच्या किमती निश्चित करण्याची जबाबदारी तेल कंपन्यांवर सोपवली. त्याचप्रमाणे, ऑक्टोबर २०१४ पर्यंत डिझेलचे दरही सरकार ठरवत होते. १९ ऑक्टोबर २०१४ नंतर डिझेलचे दर ठरविण्याचे अधिकारही तेल कंपन्यांना देण्यात आले. सध्या तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, वाहतूक खर्च आणि इतर बाबींचा विचार करून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करतात. या नव्या शुल्कवाढीमुळे वाहनचालकांसह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.