team jeevandeep 18/02/2025 mahatvachya-batmya Share
बदलापूर : उल्हास नदीच्या शेजारी बदलापूर गावाकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार दुपारी 2 वाजता होणार आहे. या अनावरण सोहळ्याला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत असून या अश्वारूढ पुतळ्याच्या अवतीभवती शिवसृष्टीही उभारण्यात येणार आहे. तसेच विविध संग्रहांचे ही या ठिकाणी निर्मिती करण्यात येणार आहे. पुतळ्याशेजारी दररोज संध्याकाळी लेजर शोचेही आयोजन करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला कळावा व त्यांचे विचार समाजात अधिक घट्ट व्हावेत या हेतूने या अश्वारूढ पुतळ्याच्या सभोवतालच्या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बदलापुरात येत आहेत. त्यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन बदलापूर पश्चिम येथील उल्हास नदी शेजारील रोझरी शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे. या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त बदलापूरकरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.
बदलापूरचे नाव शिवकालीन बदलापूर करण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूरच्या भूमीला एक वेगळं महत्त्व आहे. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जुने मंदिर बदलापूर गावात आहे. तसेच बदलापूर गावात 1920 सालापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिवजयंती उत्सवाचे अध्यक्षही होते. त्यामुळे बदलापूर हे वेगळ्या विचारांचे शहर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारं शहर म्हणून बदलापूर गावाला शिवकालीन बदलापूर असे नामकरण करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.