TEAM JEEVANDEEP 28/01/2025 mahatvachya-batmya Share
ठाणे : भिवंडी येथील भोईवाडा भागात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील १५ वर्षांपासून ते भिवंडीत वास्तव्यास असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही भिवंडी शहरात मजुरी करत होते. दलालांमार्फत ते बांगलादेशातून भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे बनवल्याचे तपासात पुढे आले आहे.
भोईवाडा भागातील लकडावाली चाळ परिसरात तीन बांगलादेशी वास्तव्य करत असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक रविवारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. त्यांच्याकडे पारपत्र नसल्याने पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची कबूली दिली.
सुमारे १५ वर्षापूर्वी ते दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा आणि तेथून कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी गाठली. भिवंडी शहरात ओळख वाढवून त्यांनी मजूरीचे काम सुरू केले होते. तसेच बनावट आधारकार्ड तयार केले. त्यानंतर त्यांनी शिधापत्रिका आणि पॅनकार्ड देखील बनविले होते. याप्रकरणी तिघांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.